आपल्या प्रार्थना कशा असाव्यात? 10 Things You Should Know about Prayer

 

आपल्या प्रार्थना कशा असाव्यात ?

आपल्या प्रार्थना कशा असाव्यात?


मूळवचन: मत्तय ६:५-८

प्रस्तावना: प्रार्थनेचे महत्व

प्रिय बंधूंनो व भगिनींनो, प्रार्थना ही ख्रिस्ती जीवनाची प्राणवायु आहे. जशी आपल्या शरीराला श्वास घेणे आवश्यक आहे, तसेच आत्मिक जीवनासाठी प्रार्थना आवश्यक आहे. पण बायबल आपल्याला शिकवते की प्रार्थना ही केवळ शब्दांची पुनरावृत्ती किंवा बाह्य आचरण नसून हृदयातून, विश्वासाने व देवासोबतच्या नात्याने केली पाहिजे. प्रार्थना केवळ मागणे नसते, तर ती देवाचे आभार मानणे, स्तुती करणे आणि त्याच्या महान कार्यांचे स्मरण करणे असते. बायबल म्हणते — निरंतर प्रार्थना करा.” [१ थेस्सलनीक ५:१७]

शलमोनची प्रार्थना – १ राजे ३:३-१५

शलमोन हा दावीदाचा पुत्र होता. त्याला देवाने इस्राएलचा राजा बनवले. शलमोनला देवाने एक विलक्षण संधी दिली — देव म्हणाला, “तू जे मागशील ते मी तुला देईन.” शलमोनाने धन, वैभव, शत्रूंचा नाश किंवा दीर्घायुष्य मागितले नाही; तर त्याने केवळ शहाणपण [ज्ञान] मागितले — “तुझ्या लोकांचा न्यायाने राज्य करावे म्हणून मला समजूतदार मन दे.”

देवाला ही विनम्र आणि आत्मत्यागी प्रार्थना फार आवडली. म्हणून देव त्यास म्हणाला, “तू जे मागितले नाहीस तेही म्हणजे  “धन, वैभव आणि सन्मान.” मी तुला देतो.
यातून आपण शिकतो की योग्य प्रार्थना देवाला प्रसन्न करते आणि त्यातून आपल्या जीवनात आशीर्वाद येतो.

१. प्रार्थना गुप्त व नम्र असावी.

प्रार्थना कधीही गर्वाने किंवा स्वार्थाने केली जाऊ नये. देव गर्विष्ठांना विरोध करतो, आणि लीनांवर कृपा करतो [याकोब ४:६].आपल्या प्रार्थनेत गर्व, दिखावा किंवा अहंकार नसावा. परुशी  आणि जकातदार यांची प्रार्थना [लूक १८:९-१४]आपल्याला शिकवते की देव नम्र हृदयाकडे पाहतो. जकातदाराने फक्त एवढेच म्हटले — “देवा, मी पापी आहे, माझ्यावर दया कर.” ही साधी पण खरी प्रार्थना देवाने ऐकली.

शलमोनाने स्वतःला “लहान मुलगा” म्हटले. त्याने मान्य केले की तो स्वतःहून काहीच करू शकत नाही.
त्याचप्रमाणे आपणही प्रार्थनेत नम्र राहावे. आपल्या मर्यादा ओळखून देवावर अवलंबून राहावे

२. प्रार्थना विश्वासाने असावी.

शंका घेऊन नव्हे, तर खात्रीने देवाजवळ जायला हवे की तो ऐकतो व उत्तर देतो.

प्रार्थना करताना आपल्याला विश्वास असावा की देव आपली प्रार्थना ऐकतो आणि योग्य वेळी उत्तर देतो. येशू म्हणाला, “तुम्ही जे काही मागाल ते विश्वासाने मागा,म्हणजे  तुम्हाला मिळेल” (मत्तय २१:२२). विश्वासाशिवाय प्रार्थना फक्त शब्द ठरते. विश्वास म्हणजे देव आपल्या भल्यासाठी कार्य करेल, जरी आपण तत्काळ उत्तर पाहत नसलो तरी.

उदाहरण: लहान मूल जेव्हा आईकडे पाणी मागते, तेव्हा त्याला खात्री असते की पाणी मिळणारच. तसाच विश्वास आपल्याकडे असावा.

३. प्रार्थना परमेश्वराच्या इच्छेनुसार असावी.

१ योहान ५:१४ सांगतो, “आपण जर त्याच्या इच्छेनुसार काही मागितले तर तो आपली प्रार्थना ऐकतो.” देवाची इच्छा आपल्यासाठी उत्तम असते. म्हणून आपली प्रार्थना केवळ आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी नव्हे, तर देवाची इच्छा प्रकट व्हावी यासाठी असावी.

येशूने गेथसेमाने बागेत प्रार्थना केली — “पित्या, माझी नव्हे तर तुझी इच्छा पूर्ण होवो.” [लूक २२:४२]
आपल्या प्रार्थना नेहमी देवाच्या इच्छेप्रमाणे असाव्यात. कधीकधी देव आपल्या मागण्या नाकारतो, कारण आपल्यासाठी चांगले काय आहे हे तो  जाणतो. [मत्तय ६:१०].त्याची योजना आपल्या चांगल्यासाठी असते. म्हणूनच आपण म्हणावे — “देवा, माझी इच्छा नव्हे, तुझी इच्छा पूर्ण होवो.”

४. प्रार्थना आभार आणि स्तुतीने परिपूर्ण असाव्यात.

आपण फक्त मागण्यासाठी नव्हे, तर धन्यवाद देण्यासाठीही प्रार्थना केली पाहिजे.

फिलिप्पै ४:६ म्हणते — “कशाचीही चिंता करू नका, परंतु प्रत्येक गोष्टीत देवापुढे प्रार्थना आणि विनंती करून आभाराने मागा.”
आपण प्रार्थना फक्त मागण्यासाठी करतो, पण आभार मानणे विसरतो. देवाने आधीच जे केले आहे त्यासाठी त्याचे आभार मानावे.
आभाराने भरलेली प्रार्थना देवाचे हृदय स्पर्श करते.

५. प्रार्थना सातत्यपूर्ण व धीराने असावी.

येशूने सांगितलेल्या विधवा स्त्रीच्या दृष्टांतातून [लूक १८:१-८] आपण शिकतो की आपण प्रार्थनेत थकू नये. देवाला आपली सातत्यपूर्ण प्रार्थना आवडते. कधी उत्तर उशिरा मिळते, पण देव कधीच विसरत नाही. सातत्यपूर्ण प्रार्थना विश्वास वाढवते आणि देवाशी आपला संबंध दृढ करते.

६. प्रार्थना पवित्र आणि शुद्ध हृदयातून असावी.

[स्तोत्र ६६:१८] म्हणते, “जर मी माझ्या अंतःकरणात पाप असते, तर प्रभूने माझे ऐकले नसते.” म्हणजेच पापी मनाने केलेली प्रार्थना देवापर्यंत पोहोचत नाही. म्हणून प्रार्थनेपूर्वी आपण आपली अंतःकरण तपासावे, पापांबद्दल क्षमा मागावी, आणि शुद्ध मनाने देवासमोर यावे.

७. प्रार्थना वैयक्तिक आणि खाजगी असावी.

येशू म्हणाला, “जेव्हा तू प्रार्थना करशील, तेव्हा तुझ्या खोलीत जा आणि दार बंद करून तुझ्या पित्याशी प्रार्थना कर” [मत्तय ६:६]. देवाला आपला बाह्य दिखावा नको असतो; तो आपली गुप्त प्रार्थना ऐकतो. खऱ्या प्रार्थनेत आपण आपली संपूर्ण भावना देवासमोर उघडपणे ठेवतो.

८. आपल्या प्रार्थना इतरांसाठीही असाव्यात (मध्यस्थी प्रार्थना)

प्रार्थना केवळ स्वतःसाठी नव्हे तर इतरांसाठीही असावी.
इयोबाने आपल्या मित्रांसाठी प्रार्थना केली तेव्हा देवाने त्याचे आशीर्वाद परत आणले [ईयोब ४२:१०].
आपण आपल्या कुटुंबासाठी, चर्चसाठी, देशासाठी, आणि शत्रूंसाठीही प्रार्थना करावी [मत्तय ५:४४]

९. प्रार्थना पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने असावी.

[रोमकर ८:२६] सांगते की, “आपण कशी प्रार्थना करावी हे आपणास कळत नाही, पण आत्मा स्वतः आपल्यासाठी विनवणी करतो.” पवित्र आत्मा आपल्या प्रार्थनेत सामर्थ्य आणतो. आत्म्याने प्रेरित प्रार्थना देवाच्या इच्छेशी सुसंगत असते आणि त्यात परिणाम दिसतो.

१०. प्रार्थना कृतीसह असावी.

प्रार्थना म्हणजे फक्त देवाजवळ मागणी करणे नव्हे; ती आपल्याला कृतीसाठी प्रेरित करते. जर आपण कोणासाठी प्रार्थना करत असलो, तर त्या व्यक्तीस मदत करण्याची तयारीही असावी. विश्वास आणि कृती दोन्ही मिळून खरी प्रार्थना प्रभावी बनवतात [याकोब २:१७].

बायबलमधील काही प्रार्थनेची उदाहरणे.

हन्नाची प्रार्थना (१ शमुवेल १): दु:खातही तिने विश्वासाने देवाला विनवले आणि देवाने तिला शमुवेल दिला.

दानिएलची प्रार्थना (दानिएल ६): संकटातही तो दिवसातून तीनदा देवापुढे नतमस्तक झाला.

येशूची प्रार्थना: प्रत्येक मोठ्या निर्णयापूर्वी येशूने एकांतात जाऊन प्रार्थना केली (लूक ६:१२).

पौलची प्रार्थना: त्याने नेहमी मंडळ्यांसाठी, विश्वासणाऱ्यांसाठी, आणि त्यांच्या वाढीसाठी प्रार्थना केली (इफिस १:१६).

सारांश

बंधूंनो, आपल्या प्रार्थना या..

गुप्त व नम्र,

विश्वासपूर्ण,

देवाच्या इच्छेनुसार,

कृतज्ञतेने भरलेल्या,

आणि सातत्यपूर्ण असाव्यात.

प्रार्थना ही देवाशी जवळीक साधण्याची संधी आहे. चला तर मग आपण खरी, मनापासून व बायबलनुसार प्रार्थना करूया, जेणेकरून देव आपल्याला ऐकेल आणि आपले जीवन आशीर्वादांनी भरून टाकेल.

 

Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url