Christian Wedding ख्रिस्ती विवाह
ख्रिस्ती विवाह सिद्धांत
विवाहाची स्थापना स्वत; परमेश्वर देवाने केली आहे.
विवाह मानवी जीवनातील एक फार महत्त्वाची बाब आहे. या संदर्भात देवाची इच्छा व योजना काय आहे हे प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने समजून घेतलेच पाहिजे. मानवी इतिहासातील पहिला विवाह एदेन बागेत झाला
देवाने मानवाला उत्पन्न केले तेव्हा त्याने त्यांना नर व नारी उत्पन्न केले,असे पवित्र शास्त्र आपल्याला सांगते (उत्पत्ती १:२७). त्याने आधी पुरुष उत्पन्न केला (उत्पत्ती २:७). मनुष्य एकटा असावा, हे बरे नाही, असे देवाने पाहिले (देवाला चांगली न दिसणारी ही पहिली गोष्ट होती). त्याने त्याला अनुरूप सहकारी होण्यासाठी स्त्री निर्माण केली.
उत्पत्ती २:१८ - देवाने त्यांना आज्ञा केली, “फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा,” उत्पत्ती १:२८. देवाने एकमेकांच्या मानवी गरजा व इच्छा ओळखून विवाह हा संस्कार नेमून दिला. पुरुष व स्त्री यांना देवाने एकमेकांसाठी उत्पन्न केले. विवाहाने पुरुष व स्त्री एकरूप होतात. मत्तय.१९:५ - आणि ती दोघे एकदेह होतील.
ख्रिस्ती विवाह म्हणजे काय ?
दोन ख्रिस्ती व्यक्ती लग्न करतात, तेव्हा त्या आयुष्यभर एकत्र राहण्याचा एकमेंकाशी व देवाशी करार करतात.
१ करिंथ.७:३९ - नवरा जिवंत आहे तोपर्यंत बायको बांधलेली आहे. विवाह आयुष्यभराचा प्रश्न आहे म्हणून ख्रिस्ती व्यक्तीने विचारपूर्वक व प्रार्थनापूर्वक लग्न करावे. या संदर्भात देवाची इच्छा व योजना काय आहे हे प्रत्येकाने समजून घ्यावे. आयुष्यातील प्रथम महत्त्वाची गोष्ट तारण आहे व त्यानंतर विवाह आहे.
![]() |
Christian-wedding |
विश्वासणाऱ्याने विश्वासणारीशीच लग्न करावे. अशी आज्ञा जुन्या आणि नव्या करारात दिली आहे. इस्राएली लोक कनान देशात स्थायिक झाले. तेव्हा देवाने त्यांना आज्ञा दिली. निर्गम ३४:१५,१६ . त्याप्रमाणे नव्या करारात ही आज्ञा आहे. २ करिंथ.६:१४-१६ - तुम्ही विश्वास न ठेवणाऱ्यांबरोबर जडून विजोड होऊ नका... ।
देवाने त्याच्या लोकांना स्पष्ट आज्ञा दिली आहे. देव मिश्र विवाह कधीही मान्य करीत नाही. अनेकांना ही आज्ञा ठाऊक नाही, दुर्लक्ष करतात किंवा याचे महत्त्व समजत नाही. मिश्र विवाहाविषयी मंडळीमध्ये शिक्षण देण्याची गरज आहे. अविश्वासणाऱ्याचे आधीच लग्न झाले असेल व त्यानंतर पतीचे किंवा पत्नीचे तारण झाले, तर गोष्ट निराळी आहे.
विवाहाचे उद्देश
१. साहचर्य विवाहीत स्त्रीपुरुषाने एकमेकांच्या गरजा जाणून एकत्र जीवन जगावे
उपदेशक ४: ९-१२ एकट्यापेक्षा दोघे बरे; कारण त्यांच्या श्रमांचे त्यांना चांगले फळ प्राप्त होते. त्यांच्यातला एक पडला तर त्याचा सोबती त्याला हात देईल; पण जो एकटा असून पडतो त्याला हात देण्यास कोणी नसते; त्याची दुर्दशा होते. दोघे एकत्र निजले तर त्यांना ऊब येते; एकट्याला ऊब कशी येईल? जो एकटा असतो त्याला कोणी माणूस भारी झाला तर त्याचा प्रतिकार दोघांना करता येईल; तीनपदरी दोरी सहसा तुटत नाही. ),
स्रीशिवाय पुरुष अपूर्ण आहे व पुरुषाशिवाय स्त्री अपूर्ण आहे. त्यांना एकमेकांच्या सहकार्याची गरज आहे.
२. गृहाची स्थापना संतती व गृहाची स्थापना हा दुसरा उद्देश आहे.
३. लैंगिक साफल्य “फलद्रूप व्हा” ही आज्ञा देवाने आदाम व हव्वा यांना दिली. लैंगिक संबंधात पतीपत्नीला आनंद मिळावा, अशी देवाची योजना आहे. हा संबंध पवित्र आहे. यात पाप नाही. स्त्री-पुरुषाची लैंगिक इच्छा पूर्ण व्हावी, हे विवाहाचे दिव्य प्रयोजन आहे.
विवाह हि पवित्र अवस्था आहे.
देवाने मनुष्याच्या सुखासाठी विवाह आयोजित केला. पतीपत्नीने एकदेह होऊन आयुष्यभर एकत्र राहावे, या परिस्थितीत एकमेकांच्या गरजा समजून एकमेकांस साहाय्य करावे. एकत्र राहण्यात त्यांना सुख मिळावे म्हणून देवाने विवाहीत स्थिती आशीर्वादित केली. जे सुख मिळावे ते अनेक कारणांमुळे काही जोडप्यांना मिळत नाही, तेव्हा घटस्फाट (सोडचिठ्ठी) घ्यावा, असे काहींचे मत आहे. वैवाहिक सुख आपोआप प्राप्त होत नाही. प्रत्येक पतीपत्नीला प्रेमात, विश्वासात व देवाच्या आशीर्वादात राहण्याचा प्रयत्न करावा लागतो. या बाबतीत साहाय्य लागत असेल, तर त्यांनी मंडळीचे पाळक किंवा प्रौढ ख्रिस्ती व्यक्तीकडूनच मार्गदर्शन प्राप्त करून घ्यावे.
घटस्फोट विषयी पवित्र शास्राचे शिक्षण
घटस्फोट देणे ही देवाची इच्छा व योजना नाही. मलाखी २:१६ - परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, मला सूटपत्राचा तिटकारा आहे; म्हणून सेनाधीश परमेश्वर म्हणतो, जो आपल्या पत्नीबरोबर क्रूरतेने वागतो त्याचा मी द्वेष करतो; तुम्ही आपल्या आत्म्याला जपा, विश्वासघाताने वागू नका.”
प्रत्येक जोडप्याने एकमेकाला क्षमा करून देवाचे साहाय्य घेऊन एकत्र राहण्याचा प्रयत्न करावा. पाहिजे असल्यास मंडळीचे पाळक किंवा वडीललोक यासकडून मार्गदर्शन मागावे. कोणतीही समस्या देवाच्या शक्तीपलीकडची नाही.
विवाहाने पती-पत्नी एकदेह होतात. यामुळे ती पुढे दोन नव्हत,तर एकदेह अशी आहेत. यास्तव देवाने जे जोडले ते मनुष्याने तोडू नये, असे प्रभू येशू ख्रिस्ताने सोडचिठ्ठीविषयी उत्तर देत असताना सांगितले (मत्तय. १९:६). मनुष्याचा अशक्तपणा व अंतःकरणाचा कठोरपणा यामुळे त्याला माझी (देवाची) योजना सिद्धीस नेता येणार नाही हे देवाला माहीत होते. म्हणून मोशेच्या काळात त्याने सोडचिठ्ठीविषयी मोशेला आज्ञा केली.
सोडचिठ्ठी ही देवाची इच्छा किंवा योजना नव्हती, हे प्रभू येशू ख्रिस्ताने स्पष्ट सांगितले.
“मत्तय. १९:७,८ - ते त्याला म्हणाले, सूटपत्र देऊन तिला टाकावे' अशी आज्ञा मोशेने का दिली? तो त्यांस म्हणाला, तुमच्या अंतःकरणाच्या कठोरपणामुळे मोशेने तुम्हांस आपल्या बायका टाकू दिल्या; तरी सुरुवातीपासून असे नव्हते.”
घटस्फोट देणे हा नियम नाही तर अपवाद आहे.
केवळ एकाच कारणामुळे घटस्फोट देण्याची परवानगी आहे ,ते कारण म्हणजे व्यभिचार.
मत्तय.१९:९ - मी तुम्हांस सांगतो की, जो कोणी आपल्या बायकोला जारकर्माच्या कारणाशिवाय टाकून दुसरी करतो तो व्यभिचार करतो आणि जो कोणी अशा टाकलेल्या स्त्रीबरोबर लग्न करतो तोही व्यभिचार करतो.
स्त्रीलाही सोडचिठ्ठी देण्याची परवानगी आहे. या बाबतीत पती किंवा पत्नी दोषी असण्याचा संभव आहे आणि दोघांना समान हक्क आहे. सोडचिठ्ठी देणे हा नियम नाही तर अपवाद आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ताने स्पष्ट सांगितले. व्यभिचाराच्या कारणावाचून ख्रिस्ती व्यक्तीने घटस्फोट घेऊन दुसरे लग्न केले, तर ती व्यक्ती व्यभिचार करते हे पवित्र शास्त्राचे स्पष्ट शिक्षण आहे. आज या शिक्षणाकडे फारसे लक्ष दिले जात नाही. ख्रिस्ती लोक वेगवेगळ्या कारणांमुळे घटस्फोट घेतात. त्यांनी पुन्हा लग्न केले. तर ते जगाच्या दृष्टीने मान्य असेल. पण ते देवाच्या वचनाविरुद्ध आहे. विवाह देवाच्या दृष्टीने पवित्र, उदात्त संस्था आहे.
समलिंगी विवाह ;
समलिंगी विवाह देवाच्या दृष्टीने महापातक आहे. देवाने स्थापना केलेले विवाहाच्या योजनेत केवळ एक पुरुष व एक स्त्री आहे. समलिंगी विवाह हि देवाची योजना नाही .
लेवीय २०;१३ कोणा पुरुषाने स्त्रीगमनाप्रमाणे पुरुषगमन केले तर ते त्या दोघांचे अमंगळ कृत्य होय;
रोम १;२६,२७ ह्या कारणांमुळे देवाने त्यांना दुर्वासनांच्या स्वाधीन केले; त्यांच्यातल्या स्त्रियांनी शरीराचा नैसर्गिक उपभोग सोडून विपरीत आचरण केले. तसेच पुरुषांनीही स्त्रियांचा नैसर्गिक उपभोग सोडून परस्परे कामसंतप्त होऊन पुरुषांनी पुरुषांबरोबर अनुचित कर्म केले आणि त्यांनी आपल्या भ्रांतीचे योग्य प्रतिफळ आपल्या ठायी भोगले.
You might like this too 👇
बायबलनुसार योग्य जोडीदार कसा निवडावा
You can comment and share .....!