Biblical responsibilities of a husband and father
Biblical responsibilities of a husband and father
पतीने आपल्या पत्नीचे आणि कुटुंबाचे योग्य पुढारीपण कसे करावे ?
आज अनेक कुटुंबांत ताणतणावाचे वातावरण पहाण्यास मिळते , याचे मुख्य कारण म्हणजे पतीकडून पुढारीपणाचा अभाव किंवा जबाबदारीविषयी बेजबाबदारपणा होय. परमेश्वरदेवाने कौंटुंबिक पुढारीपणाची जबाबदारी ही पतींवर सोपवलेली आहे ; परंतु काहीं पतीना याची जाणीव देखील नाही. बहुतेक पुरुषांना हे लक्षात येत नाही की त्यांच्या घरात उद्भवणाऱ्या गंभीर समस्या त्यांच्या नेतृत्वाच्या अभावामुळे आहेत. जेव्हा आदाम आणि हव्वेने बागेत पाप केले तेव्हा देवाने आदामाला विचारले, "तू कुठे आहेस?" देवाने प्रथम आदामास विचारले, हव्वेला नाही. कारण पुरुषांकडून नेतृत्वाची जबाबदारी पार पाडावी ही देवाची इच्छा आहे (उत्पत्ति 3:9).
![]() |
Biblical responsibilities of a husband and father |
पती हा कुटुंबप्रमुख आहे.
Duties of a husband in the bible
प्रेषित पौल इफिसच्या मंडळीला लिहिताना स्पष्ट करतो की पतीने घरातील नेतृत्वाची जबाबदारी घ्यावी. तो लिहितो कि, स्त्रियांनो, तुम्ही जशा प्रभूच्या अधीन तशा आपापल्या पतीच्या अधीन असा. 23कारण जसा ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे, तसा पती पत्नीचे मस्तक आहे. शिवाय ख्रिस्त हाच शरीराचा तारणारा आहे [इफिस 5:22-24]. या संदर्भातील “मस्तक” या शब्दाचा अर्थ प्रमुख किंवा मुख्य असा आहे. पौल या ठिकाणी स्पष्टपणे आपल्या पत्नीचे नेतृत्व करण्याबद्दल सांगत आहे. शिवाय, पौलाने मंडळीचा प्रमुख म्हणून ख्रिस्ताचे उदाहरण वापरले जेणेकरून आपण , पती या नात्याने आपल्या कृतींची ख्रिस्ताशी तुलना करू शकू. म्हणून, पतींनो, येशूचे अनुयायी म्हणून आपले पुरुष नेतृत्व कसे असावे याचे उत्तम उदाहरण म्हणून आपल्या गुरुकडे पाहूया.
बायबल
आधारीत पती कुटुंबाची तरतूद करतो .
Husband financial responsibility in the Bible
घरामधील जबाबदाऱ्यांची विभागणी करण्याच्या संदर्भात, पवित्रशास्त्र पतींना त्यांच्या कुटुंबाची तरतूद करण्याची सूचना देते. याचा अर्थ असा आहे की, तो काम करतो आणि त्याच्या पत्नीच्या आणि मुलांच्या सर्व आवश्यक गरजांची तरतूद करण्यासाठी पुरेसे पैसे कमवतो. असे करण्यात अपयशी होत असेल तर निश्चितच त्याचे आत्मिक परिणाम देखील आहेत. “जर कोणी स्वकीयांची, व विशेषकरून आपल्या घरच्यांची तरतूद करीत नाही, तर त्याने विश्वास नाकारला आहे; तो माणूस विश्वास न ठेवणाऱ्या माणसापेक्षा वाईट आहे” [1तीमथ्य 5:8]. म्हणून, जो माणूस त्याच्या कुटुंबाची तरतूद करण्याची कोणतीच धडपड करीत नाही तो स्वतःला ख्रिस्ती म्हनवण्याच्या योग्य नाही. याचा अर्थ असा नाही की, पत्नी कुटुंबाची सहाय्यता करण्यात मदत करू शकत नाही. नीतीसुत्रे 31 सांगते की देवभक्तीत असलेल्या स्त्रीने कोणत्या गोष्टी निश्चितपणे केल्या पाहिजेत. परंतु कुटुंबाची तरतूद करणे ही तिची मुख्य जबाबदारी नाही; ती तिच्या पतीची आहे.
पती कुटुंबासाठी रक्षक आहे.
Duties of a husband in the bible
देवाने पुरुषांना स्त्रियांपेक्षा शारीरिकदृष्ट्या बलवान बनवले यासाठी कि, ते कुटुंबाचे रक्षण करू शकतील. देवाने पुरुषास ताकत दिली, पत्नी आणि मुलांवर हात उचलण्यासाठी नाही. तुम्ही तोडफोड करणारे नाहीत; तर तुम्ही कुटुंब घडवणारे आहात. एक जबाबदार सेवकवृती असणारे पुढारी आहात . वैवाहिक जीवनात आवाज चढवणे योग्य नाही. त्यापेक्षा चर्चा होणे सोयीस्कर आहे. जेव्हा पुरुष त्यांचा आवाज वाढवतात, तेंव्हा ते बसून चर्चा करण्याची संधी गमावतात. येशू त्याच्या मंडळीशी गैरशिस्त वागत नाही यास्तव पुरुषांनीही त्यांच्या पत्नींचा गैरफायदा घेऊ नये (इफिस 5:25). विवाहाद्वारे तुमच्याशी विवाहबद्द झालेल्या देवाच्या मुलीवर वर्चस्व गाजवण्यास, दमदाटी करण्यास, नियंत्रित करण्यास किंवा दबाव टाकणे ई. वचनानुसार नाही. सेवक नेता या नात्याने तुम्ही तुमच्या जोडीदाराची काळजी घेतली पाहिजे आणि तुमच्या कुटुंबाचे रक्षण केले पाहिजे.
कौंटुंबिक पुढारीपण म्हणजे काय ? ते कसे करावे ?
1. प्रेमपूर्वक पुढारीपण करणे:
हे नेतृत्व पत्नीवर अथवा मुलांवर हुकुमशाही, खालच्या पातळीवर गेलेले, किंवा आपण वरच्या पातळीवर आहोत असे वागणूक देणारे नसायला पाहिजे. घरातील पतीचे नेतृत्व सर्वप्रथम प्रीतीखातर असले पाहिजे. तर प्रेम हे एक मुख्य तत्व आहे जे आपल्या प्रत्येक गोष्टीत प्रकट व्हायला हवे. पौल करिंथ मंडळीच्या पुढार्यांना मंडळीचे नेतृत्व करताना काय सांगतो ते पहा. 13 सावध असा, विश्वासात स्थिर राहा, मर्दासारखे वागा; खंबीर व्हा. 14 तुम्ही जे काही करता ते सर्व प्रीतीने करा [1 करिंथ 16:13-14]. म्हणून, तुम्ही हिम्मत धरून , विश्वासाने आणि प्रेमाने वागले पाहिजे. तुम्ही एकाच वेळी खंबीर आणि प्रेमळ असू शकता. याचे येशू हे प्रमुख उदाहरण आहे. तो परिस्थितीनुसार खंबीर आणि सौम्य अशा दोन्ही प्रकारे होता. त्याने मंदिरात क्रयविक्रेय करणार्याना हाकलून देऊ शकला, परंतु त्याचवेळी येरुशलेमसाठी रडला. त्यामुळे, काहीही असो तुम्ही तुमच्या घरात एक पती अथवा मुख्य या नात्याने पुढारीपणाचा अधिकार, धैर्याने आणि प्रेमाच्या कोमलतेने करा.
2. स्वतः होऊन पुढाकार घेणे:
प्रेम तुम्हास स्वतःहून पुढाकार घेण्यास प्रवृत्त करेल. हे खऱ्या पुढार्याचे एक वैशिष्ट्य आहे. उत्तम पुढारी विचार देण्यासाठी दुसर्याची वाट पाहत नाही; तो स्वतः पुढाकार घेतो. आपल्यातील देवाचे प्रेम हे आपल्या सर्वांशी नाते निर्माण करते आणि त्या प्रेमामुळे आपण प्रतिसाद देतो. पहिल्याने त्याने आपल्यावर प्रीती केली, म्हणून आपण त्याच्यावर प्रीती करतो [१ योहान ४:१९]. कारण मनुष्याचा पुत्र ‘हरवलेले शोधण्यास व तारण्यास आला आहे [लूक 19:10].
येशू आरंभकर्ता होता. जर ख्रिस्ताने प्रथम मंडळीवर प्रेम केले तसे तुम्ही तुमच्या पत्नीवर प्रेम करत असाल तर तुम्ही तुमच्या नातेसंबंधात आरंभकर्ता बनता. मला हे म्हणायचे आहे की, तुम्ही तुमच्या घरात आध्यात्मिक वातावरण निर्माण कराल. तुम्ही प्रार्थना आणि कौटुंबिक भक्ती सुरू कराल. समस्यांचे निराकरण करण्यात , सल्लामसलत करण्यासाठी किंवा खर्चाबाबतचा निर्णय यासाठी तुम्ही पुढाकार घ्याल. घरप्रमुख म्हणून, तुम्ही तुमच्या वैवाहिक जीवनातील इतर क्षेत्रात पुढाकार घ्याल. असे केल्याने तुमच्या पत्नीला व्यावहारिक रित्या समजेल कि, तुम्हाला तिची आणि कुटुंबाच्या कल्याणाची किती काळजी आहे. तुमच्या नेतृत्वामुळे तुमची पत्नी तुमचा आदर करेल .
3. एक उदाहरण बनून नेतृत्व करणे: प्रेमाखातर तुम्ही उदाहरण बनून नेतृत्व कराल. येशूला ठाऊक होते की तो एक शिष्यासाठी उदाहरण असणार आहे आणि ते आवश्यकच होते. तो शिष्यांना म्हणाला मी तुमच्यासमोर एक उदाहरणाप्रमाणे आहे , जसे मी तुमच्याशी अनुकरण केले तसेच तुम्ही देखील करावे [योहान १३:१५]. पौल म्हणतो 'जसा मी ख्रिस्ताचे अनुकरण करणारा आहे तसे तुम्हीही माझे अनुकरण करणारे व्हा' [1करिंथ 11:1]. काय तुम्ही तुमच्या पत्नी आणि मुलांना हे म्हणू शकता का ?
तुमच्या पत्नीने आणि मुलांनी तुमच्या कुटुंबाचा पुढारी म्हणून तुमचा आदर करावा असे तुम्हाला वाटत असेल तर कुटुंबात तुम्ही एक उदाहरण असणे महत्त्वाचे आहे. काय म्हणून तुमच्या कुटुंबाने तुमचा आदर करावा अशी तुमची इच्छा आहे, एक कर्ता पुरुष म्हणून कि, एक देवभिरू व्यक्ती म्हणून ?
तर यावेळेस विचार करा, काय मी माझ्या परिवारात उदाहरण अथवा आदर्श म्हणून जीवन जगत आहे का ? माझ्या बोलण्यात, संयम, पवित्रता, विश्वास, देवाची नितीमत्ता, वैयक्तिक शिस्त आणि नैतिक तत्त्वांप्रती बांधिलकी यामध्ये देवनिष्ठ आहात का ? काय मी माझ्या पत्नीला आणि मुलांना 'माझ्याप्रमाणे येशूचे अनुसरण करा’ असे म्हणू शकतो का ? जेव्हा उदाहरण म्हणून अपयशी ठरता तेव्हा तुम्ही तुमचे अपयश नम्रपणे मान्य करणे गरजेचे आहे.
4. व्यवस्थापनात पुढाकार घेणे:
पती या नात्याने तुम्ही तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे व्यवस्थापक असावे. याचा अर्थ असा नाही की तुमच्या कुटुंबातील प्रत्येक काम तुम्हीच करावीत पण सर्वकाही व्यवस्थित होईल याविषयी दक्षता घ्यावी लागेल.
मंडळीमध्ये पुढारीपण करण्यासाठी आवश्यक असलेल्या कौंटुंबिक पुढारीपणाचे महत्त्व पौल तीमथ्याला स्पष्ट करतो. तो शिकवतो कि, ज्याला आपल्या घरची व्यवस्था चांगली ठेवता येत नाही, तो देवाच्या मंडळीचा सांभाळ कसा करील ?' [1 तीम 3:5].
तुम्ही तुमच्या घराचे व्यवस्थापक आहात, जसे की एखाद्या व्यवसायाचा किंवा कंपनीचा व्यवस्थापक असतो. चांगले व्यवस्थापन करण्यासाठी, आपल्या घरात काय चालले आहे याची आपणास सर्वप्रकारे जाणीव असणे आवश्यक आहे. याचा अर्थ तुम्हाला तुमच्या घरातील प्रत्येकाचे अध्यात्मिक जीवन, आर्थिक व्यवहारावर लक्ष ठेवणे, मुलांना शिस्त लावणे तसेच घरातील आवश्यकता पूर्ण करणे ई. यासारख्या जबाबदाऱ्या संभाळणे घर प्रमुखाचे कर्तव्य आहे.
5. आध्यात्मिक नेतृत्व करणे :
तुम्ही तुमच्या परिवारासाठी घरघुती पाळक आहात. पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या कुटुंबाला रविवारच्या उपासनेमध्ये आणण्याची जबाबदारी ही तुमची आहे. तुमच्या मुलांसमोर रविवारच्या उपासानेशिवाय ईतर पर्याय ठेऊ नका. घरघुती पाळकाला दुसरी गोष्ट करावी लागते ते म्हणजे पत्नी आणि मुलांसमोर विश्वासी जीवन जगणे. तुमच्या कुटुंबाला फक्त चर्चमध्ये आणू नका तर विश्वासात देखील आणायाचे आहे. दररोज कौटुंबिक भक्ती स्थापित करा. कुटुंबातील कोणताही सदस्य तुमच्याकडे समस्या घेऊन असल्यास, त्यांना तुमच्या पाळकाकडे नेण्यापूर्वी येशूकडे घेऊन जा.
पत्नी आणि मुलांचे आध्यात्मिक नेतृत्व करण्यासाठी स्वतःची तयारी कशी कराल ?
यासाठी, तुम्हाला आधी आध्यात्मिकरित्या समर्पित असायला हवे. जे आपणास ठाऊक नाही ते आपण ठामपणे इतरांना सांगू शकत नाही. येशू परुशांना आंधळे मार्गदर्शक म्हणतो. “ते आंधळ्यांचे आंधळे वाटाडे आहेत आणि आंधळा आंधळ्याला नेऊ लागला तर दोघेही खाचेत पडतील” [मत्तय १५:१४]. हे धार्मिक नेते आध्यात्मिकदृष्ट्या अंधाळे होते आणि त्यांच्या नेतृत्वाच्या जबाबदाऱ्या ते पार पाडू शकत नव्हते. जर प्रथम मनुष्य पवित्र आत्म्याचा उत्तम अनुयायी नसेल तर तो उत्तम पुढारी होऊ शकत नाही. जर तुम्ही परमेश्वराद्वारे चालवले जात नसाल तर तुम्ही तुमच्या घराचे नेतृत्व यशस्वीरित्या करू शकत नाही. याचा अर्थ सर्वात प्रथम तुम्ही येशू ख्रिस्ता चा शिष्य असणे आवश्यक आहे. तुमचे मार्गदर्शक बायबल आहे. तुमच्या पत्नीला आणि मुलांना देवाच्या राज्यात नेण्यासाठी आवश्यक असलेली आध्यात्मिक सत्य तुम्ही जाणून घेतलेले असावे. [स्तो.25:5] “तर तुम्ही पहिल्याने देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळवण्यास झटा म्हणजे त्यांच्याबरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हांला मिळतील” [मत्तय 6:33]. जोपर्यंत तुम्ही प्रथम देवाचे राज्य शोधत नाही तोपर्यंत तुमच्या आध्यात्मिकतेचा तुमच्या पत्नीवर किंवा मुलांवर कोणताही परिणाम होणार नाही.
याकरिता ,सर्वात सोपा मार्ग म्हणजे मोशेने दिलेल्या उदाहरणाचे अनुसरण करणे. 5 तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जिवाने व पूर्ण शक्तीने प्रीती कर.6 ज्या गोष्टी मी तुला आज बजावून सांगत आहे त्या तुझ्या हृदयात ठसव; 7 आणि त्या तू आपल्या मुलाबाळांच्या मनावर बिंबव; आणि घरी बसलेले असताना, मार्गाने चालत असताना, निजताना, उठताना त्यांविषयी बोलत जा. 8 त्या आपल्या हाताला चिन्हादाखल बांध आणि आपल्या डोळ्यांच्या मध्यभागी कपाळपट्टी म्हणून लाव" [अनु. ६:५-७]. होय जेवणाच्या वेळी, गाडी चालवताना, तुम्ही झोपत असताना, तुमच्या प्रार्थनेच्या वेळी देवाने तुम्हाला शास्त्रवचनांतून जे शिकवले ते शेअर करा. असे केल्याने तुम्ही तुमच्या पत्नी आणि मुलांना देवाच्या वचनामध्ये वाढ करत आहात [इफिस 5:26-27].
पुरुष नेतृत्व करण्यास अयशस्वी होतात याची काही कारणे पुढीलप्रमाणे असू शकतात;
- अनेक वेळा पुरुषांना त्यांच्या मूळपरिवारातून आदर्श नेतृत्व शिकण्यास मिळालेले नसते.
- मंडळीतून त्यांनी पतीच्या नेतृत्वाबद्दल ऐकलेले नाही.
- काही पती आळशी किंवा बेपर्वाई असतात. जो काही पत्नी निर्णय घेईल त्यास लगेच सहमत होतात.
- काही पतीना त्यांच्या पत्नी भूतकाळात घेतलेल्या वाईट निर्णयांची आठवण करून देऊन हिंमत हरवतात; त्यांच्या घरातील नेतृत्वाला आव्हान करतात.
- पती आपल्या पत्नीचे नकारात्मक शब्द किंवा नेतृत्व सोडण्याबद्दल सतत कठोर शब्द ऐकून निराश होतात.
पुरुषाच्या अयशस्वी नेतृत्वाबद्दल वरीलपैकी कोणतेही कारण देवबाप मान्य करणार नाही.
Blog by Pastor Deepak Shelke
Source; Personal meditation, sermon By Vladimir Savchuk , gotquestion ,Pr.Steve
Caar,