True and False prophets खरे चमत्कार आणि खोटे चमत्कार कसे ओळखावे ?
True and False prophets
खरे चमत्कार आणि खोटे चमत्कार कसे ओळखावे ?
खरे संदेष्टे आणि खोटे संदेष्टे कसे ओळखावे ?
आपण निर्गमध्ये वाचतो . देवाचा सेवक मोशेने चमत्कार केले तसेच मांत्रिकाने ही चमत्कार केले .परंतु मोशेने देवाच्या सामर्थ्याने चमत्कार केले आणि मांत्रिकाने मंत्रतंत्रांच्या साह्याने चमत्कार केले.
“निर्गम ७; १०,११ - मग मोशे व अहरोन ह्यांनी फारोजवळ जाऊन परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केले; अहरोनाने आपली काठी फारो व त्याचे सेवक ह्यांच्यापुढे टाकली तेव्हा तिचा साप झाला.मग फारोनेही जाणते व मांत्रिक बोलावले; मिसराच्या त्या जादुगारांनीसुद्धा आपल्या मंत्रतंत्रांच्या योगे तसाच प्रकार केला.त्यांनीही आपापल्या काठ्या खाली टाकताच त्यांचे साप झाले; पण अहरोनाच्या काठीने त्यांच्या काठ्या गिळून टाकल्या.”
२ थेस्सल २;९ -ज्यांचा नाश होत चालला आहे त्यांनी आपले तारण साधावे म्हणून सत्याची आवड धरायची ती धरली नाही; त्यामुळे त्यांच्यासाठी सैतानाच्या कृतीप्रमाणे सर्व प्रकारची खोटी महत्कृत्ये, चिन्हे, अद्भुते आणि सर्व प्रकारचे अनीतिजनक कपट ह्यांनी युक्त असे त्या अनीतिमानाचे येणे होईल.
यावरून आपणास समजते कि सर्वच चिन्हे व चमत्कार हे देवापासू नाहीत . तसेच सर्वच संदेष्टेही हे देवापासून नाहीत .
झालेला चमत्कार व चिन्हे कोणापासून आहेत . हे ओळखण्यासाठी आपण पवित्रशास्राच्या आधारानुसार काही लक्षणाचा अभ्यास करणार आहोत.
१ . सर्वात प्रथम त्या चमत्काराद्वारे देवाचे गौरव होतो का ते तपासा.
पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येक चिन्हे व प्रत्येक चमत्काराने देवाचाच गौरव झाला पाहिजे , उपदेशकाचा नव्हे , उपदेशाचा नव्हे , मिनीस्ट्री किंवा चर्चचा देखील नाही तर त्याद्वारे येशू ख्रिस्ताचाच गौरव झाला पाहिजे.
योहान १६; १४ येशू म्हणाला जेव्हा पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तो माझे गौरव करील. पवित्र आत्म्याचे मुख्य कार्य म्हणजे येशूचा गौरव करणे. पवित्र आत्मा जे काही करतो तो देवाचे गौरव करतो आणि जर पवित्र आत्मा चिन्हे आणि चमत्कार करतो तर त्याद्वारे देवाचे गौरव होते.
२. ते चिन्हे आणि चमत्कार देवाच्या स्वभावाशी सुसंगत आहेत का ?
ते नेहमी देवाचा स्वभाव प्रकट करतील. तुम्हाला माहीत आहे का आपला देव हा नीतिमान देव आहे ? त्याची सर्व कार्य सत्य आणि न्यायाची आहेत . जर घडलेली अद्भुत गोष्ट किंवा चमत्कार देवाच्या स्वभावाशी किंवा वचनाशी सुसंगत नसतील . तर मी तुम्हाला सांगेन की तो चमत्कार करणारा येशू, पवित्रशास्रातील येशू नाही. तो दुसरा कोणीतरी येशू असावा. माझा येशू नीतिमान आहे, माझा येशू न्यायाने परिपूर्ण आहे . माझा येशू सत्याने भरलेला आहे. परंतु जर तुम्हाला खर्या येशूचीच ओळख नसेल तर तुम्ही फसवला जाल यात शंका नाही...! ज्यांना असे वाटते की ते फसवले जाणार नाहीत ते पहिले फसले जातील . म्हणून आलेली भविष्यवाणी, प्रगटीकरण, संदेश वचनाशी जुळतात का त्याची पडताळणी करा , अभ्यासू आणि देवभिरू सेवकांशी सल्लामसलत करा . जेणेकरून आपण सुरक्षित राहू, आपली फसवणूक होणार नाही. आपण सर्व भाऊ-बहिण आहोत. आपण एक कुटुंब आहोत. का अति-अध्यात्मिक होताय..! मला सर्व काही माहित आहे...! मला सर्व कळतंय ... , नाही-नाही... असं नको .ते बायबलआधारीत आहे का..? खात्री करुया .
पहा पौल बिरुया येथील लोकाबद्दल काय म्हणत आहे ?
“ प्रेषित १७;११ - तेथील लोक थेस्सलनीकातल्या लोकांपेक्षा मोठ्या मनाचे होते; त्यांनी मोठ्या उत्सुकतेने वचनाचा स्वीकार केला, आणि ह्या गोष्टी अशाच आहेत की काय ह्याविषयी ते शास्त्रात दररोज शोध करत गेले.”
३. त्याचा उगम तपासा. -
उगम देवाशिवाय ,पवित्र आत्म्याशिवाय दुसरा कोणताही नसावा .
४ . देवापासून असणारे प्रत्येक चिन्ह-चमत्कार, प्रत्येक भविष्यवाणीने आत्मिक उन्नती होते.
शांतीचा अनुभव होतो , बंधनातून मुक्ताता होते , बोध होतो , बळ मिळते , केवळ तात्पुरते समाधान मिळत नाही.
उदा. निनवेचा पश्चात्ताप
योना ३;१-१० ......देवाने त्यांचे वर्तन पाहिले म्हणजे अर्थात ते आपल्या कुमार्गापासून वळले आहेत हे पाहिले; तेव्हा ‘त्यांच्यावर अरिष्ट आणीन’ असे जे तो म्हणाला होता त्याविषयी तो अनुताप पावला आणि त्याने त्यांच्यावर ते आणले नाही.
कोणीतरी आश्चर्यकर्म करतो. आणि लोकांची प्रतिक्रिया ... व्वाह ... व्वाह.. ! हा सर्व उत्साह तात्पुरता आहे. त्याद्वारे जीवन परिवर्तन नाही,पश्चाताप नाही , आध्यात्मिक वाढ नाही, केवळ दिखावा ..ढोंगीपणा .
आजकाल पुष्कळ खोटे दावे ऐकण्यास मिळतात कि , ‘ देव मला दाखवत आहे कि,देव तुम्हाला एक नवीन कार देत आहे, परदेशात घर देणार आहे.” या भविष्यवाणीने काय आतील मनुष्याला आत्मिक फायदा मिळतोय ? नाही ! तुमचा स्वभाव बदलला का ? नाही..! ते सुधारलेत का ? नाही ! हे ऐकण्यासाठी भलीमोठी गर्दी .
“देव मला दाखवत आहे” हा प्रकार केवळ सेवंकामध्येच नाहीतर मंडळीत देखील अधिक पहाण्यास मिळत आहे. “देव मला दाखवत आहे...! हा काय गंमतीचा विषय आहे ” ?
होय देव दाखवतो , तेंव्हा ते बायबलशी सुसंगत असते. शिवाय त्याची पडताळणी सुद्धा करता येते . बायबलमध्ये याबद्दलची उदाहरणे पहाण्यास मिळतात .
उदा.१) येशूच्या जन्माचे भाकीत – मरीयेसोबत योसेफाला देखील दाखवले . मत्तय १;१९,२०तिला गुप्तपणे सोडण्याचा त्याने विचार केला.असे विचार त्याच्या मनात घोळत असता पाहा, प्रभूच्या दूताने त्याला स्वप्नात दर्शन देऊन म्हटले, “योसेफा, दाविदाच्या पुत्रा, तू मरीयेचा आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्यास अनमान करू नकोस, कारण तिच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे.
उदा.२ ) पेत्र व कर्नेल्य – प्रेषितांचे कृत्य १०;१-२३ .....पेत्र त्या दृष्टान्ताविषयी विचार करत असता आत्मा त्याला म्हणाला, “पाहा, तीन माणसे तुझा शोध करत आहेत. तर ऊठ, खाली ये आणि काही संशय न धरता त्यांच्याबरोबर जा; कारण मीच त्यांना पाठवले आहे.”
आपण पाहतो मोठमोठ्या प्रार्थनासभेत काही संदेष्टे तर ते एखाद्या व्यक्तीला केंद्रित करून २० मिनिटे त्या व्यक्तीबद्दल भविष्यवाणी करतात. आणि संपूर्ण मंडळी जल्लोष करते . कधीकधी ४५ मिनिटे. सगळी माहिती सांगतात . जन्मतारीख, गावाचे नाव ,बहिणीचे नाव, भावाचे नाव, गाडीचा नंबर, बँक खाते क्रमांक .... एकापाठोपाठ एक ४५ मिनिटे हेच चालते . बाकीचे मंडळी केवळ पाहत बसते . यातून कोणीही सुधारत नाही. कुणाचे तारणही होत नाही . फक्त मनोरंजन..! आणि जगाचे हसू ..होते . बस्स एवढेच.
५. चमत्काराद्वारे मंडळीत भय पसरते .
प्रेषितांची कृत्ये ५; ११-१४
या घटनेतून लक्षात घ्या कि,
प्रत्येक वेळी चमत्कार घडला , मंडळीत
भय पसरले . देवाचे इतके भय झाले की काही लोकांना मंडळीत सहभागी होण्यास देखील भीती
वाटायची . . आज असे चमत्कार घडतात का ?
हनन्या आणि सप्पीरा खोटे बोलले आणि काय झाले ... त्या दोघानाही देवाकडून शासन झाले, ते दोघेही मेले. मी देवाचे आभार मानतो की असे खरे चमत्कार आणि चिन्हे आज पाहाण्यास मिळत नाहीत. अशी शक्ती आज चर्चमध्ये नाही. जर असती तर चर्चचे किती सदस्य मृत्यू होतील हे सांगू शकत नाही. कधी कधी पाळक स्वतः मृत्यू होतील , तर कधी आमंत्रित संदेष्टे मृत्यू होतील. खोटे उपदेशक देखील मरेल. कल्पना करा की जर चर्चमध्ये असे सामर्थ्य असते तर लोकांना देवाचे किती भय असते.
आपल्या समोर होणारे हे भविष्यवाणी ,चिन्हे आणि चमत्कार खरे कि खोटे कसे माहीत होणार , तर लोकांनामध्ये परमेश्वराची भीती पसरेल .
आजकाल अशा प्रकारच्या प्रार्थनासभा पाहण्यास मिळतात कि जेथे मुख्य वक्ता गर्दीला उद्देशून बोलतो . काय मी भविष्यवाणी करावी का ? काय खरेच मी भविष्यवाणी करावी का? आणि लोक म्हणतात हो आम्हास भविष्यवाणी पाहिजे...! माहित नाही कोठून ही पद्धत आली ? . कोणाचेही अनुकरण करू नका.तर बायबलचे अनुकरण करा, बायबलचे....!
देवाची भीती असली पाहिजे. आजकाल अशा भविष्यवाणी म्हणजे ढोंगी ख्रिस्तीलोकासाठी गंमत वाटत आहेत. आणि पुलपीटवरून साहेब भविष्यवाणीवर.. भविष्यवाणी करताय... आणि लोकांच्या जीवनात परमेश्वराच भय नावाच लवलेशही दिसत नाहीये . जगाला हसू होतंय ते टिंगल करताय... सुरुवातीचे दिवसात जेव्हा कोणीतरी भविष्यवाणी करत तेंव्हा लोक पश्चातापी अंत;करणाने रडताना दिसत. मी मनात प्रार्थना करत असे की, देवा माझे हृदय , माझं पाप या उपदेशकास प्रकट करू नको. आजकाल येथे कोणतेही पाप उघड होत नाही, फक्त बँक खाते उघड केले जाते. फोन नंबर उघड केला जातो . विदेशी जाण्यासबंधी प्रकट केले जाते.लोकांना खोटे दृष्टात सांगितले जातात .एकदा तर एका सेवकाने मला फोन करून संगितले कि देवाने मला दाखवले आहे कि, “तुमच्या परीवारात अपघात होणार आहे” . मी घाबरून न जाता प्रार्थना केली “प्रभू जोपर्यंत तू मलाही वैयक्तिकरीत्या सांगत तोपर्यंत मी विश्वास करणार”. देवाने मला काही दाखवलेही नाही आणि काही त्या सेवकाने सांगितल्याप्रमाणे घडलेही नाही. आळशी ख्रिस्ती येशूचे भक्त नाहीत तर ,अशा भविष्यवाणी करणाऱ्याचे पापाभक्त आहेत. असे भक्त वचनातून फेर पडताळणी करण्याचे कष्टही घेत नाहीत.
६ . शास्रातून त्यास दुजोरा मिळतोय का ते तपासा.
प्रियानो, ते शास्त्रानुसार आहे का ? प्रत्येक भविष्यवाणी, प्रत्येक दृष्टांत हे देवाच्या वचनाशी सुसंगत आहे का ? याची पडताळणी करा . कधीकधी आमच्या पाळकाने स्वीकारले आहे म्हणून आम्ही देखील स्वीकारतो. एखाद्या मंडळीने मान्य केले म्हणून आम्ही देखील मान्य करतो . नाही.. हे योग्य नाही. याचा अर्थ असा नाही की एखाद्या पाळकाने किंवा मंडळीने मान्यता दिली म्हणजे आम्ही पण त्याला मान्य असले पाहिजे ,
तर आपण पवित्र आत्म्याचे ऐकू या. पवित्र आत्मा काय सांगत आहे ? ते देवाच्या वचनाशी सुसंगत आहे का ते तपासा.
७. खोठा व खरा संदेष्ठा कसा ओळखावावा ?
“मत्तय १२; ३३ - झाड चांगले आणि त्याचे फळ चांगले’ असे म्हणा; अथवा ‘झाड वाईट आणि त्याचे फळ वाईट’ असे म्हणा; कारण फळावरून झाड कळते.”
झाडाची ओळख त्याच्या फळांमुळे होते. एखाद्या संदेष्टयाला त्याच्या कृपादानावरून मूल्यांकन करू नका. तर त्याच्या चरित्र नुसार मूल्यांकन करा.
“मत्तय ७; २०. ह्यास्तव तुम्ही त्यांच्या फळांवरून त्यांना ओळखाल”. प्रत्येक खरा संदेष्टा व खोट्या संदेष्ट्यांना कृपादानावरून नव्हे, तर त्यांच्या फळांवरून पारख करा . त्या संदेष्ट्याचे देवावर प्रेम आहे का ते तपासा. त्यांची साक्ष तपासा, त्यांची वृत्ती पहा.
एखादी व्यक्ती संदेश देत आहे , तो आत्मे जिंकत आहे, त्याच्याकडून चमत्कार देखील घडताय . याचा अर्थ असा नाही की, तो अगदी सत्य माणूस आहे. तुम्ही ऐकत आहात का ? जरी तो आत्मे जिंकत असेल किंवा चमत्कार घडत असतील तरी तो खोटा असू शकतो .
“मत्तय ७;२२- त्या दिवशी पुष्कळ जण मला म्हणतील, ‘प्रभो, प्रभो, आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला, तुझ्या नावाने भुते घालवली व तुझ्या नावाने पुष्कळ महत्कृत्ये केली नाहीत काय ?
तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन की, ‘मला तुमची कधीच ओळख नव्हती; अहो अनाचार करणार्यांनो, माझ्यापुढून निघून जा.”
म्हणूनच संभाळा..! , तुम्हास प्रभावित करणारा संदेष्टा हा पवित्र जीवन जगत आहेत का ? देवभिरू आहेत का ? ते नम्र आहेत का ? याची पारख करा .
अनेक स्वता;ला उपदेशक म्हणनारे प्रसिद्धीच्या मागे आहेत, स्वता;ला पवित्र भासविणारे काही उपदेशक व्यभिचारात जीवन जगात आहेत , स्वता;ला फार हुशार समजणारे स्वार्थी सेवक दान-दशांशच्या नावाखाली मंडळीला लुटत आहेत .
२ करिंथ ११;१३ कारण अशी माणसे म्हणजे खोटे प्रेषित, कपटी कामदार, ख्रिस्ताच्या प्रेषितांचे सोंग घेणारी अशी आहेत.
मागील दोन वर्षापूर्वी एक पाळकाने मला एका आठवड्यात सवलतीच्या दरामध्ये तुम्हास बायबल उपलब्ध करून देतो .असे सांगून मोठी रक्कम माझ्याकडून घेतली . आणि आजपर्यत आज देतो- पुढील आठवड्यात देतो अशी हजारो खोटी आश्वासने केलीत.
पहा आपला शत्रू सैतान यास माहित आहे की त्याच्याकडे आता फार थोडा वेळ राहिला आहे. यामुळे तो गर्जणार्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधत फिरतो आहे .पेत्र ५;८
“यामुळे सर्व परिस्थितीत पौलाप्रमाणे आपला एकच उद्देश असावा . तो म्हणजे , मला येशूला जाणून घ्यायचे आहे . चिन्हे-चमत्कार नव्हे , तर “मला येशूला अधिकाधिक जाणून घ्यायचे आहे” हाच ध्यास असावा .प्रेषित पौलाची आठवण करा तो दमास्कसला जाताना येशूला भेटला. त्याने तो अद्भुत प्रकाश पाहिला, त्याने येशूचा आवाज ऐकला. त्या अनुभवानंतरही. तो म्हणातो मला येशूला जाणून घ्यायचे आहे; मला त्याला जाणून घ्यायचे आहे.” इतर सर्व गोष्टी. मी नुकसान अशा मोजतो. जेणेकरून मी येशू ख्रिस्ताला ओळखू शकेन. हीच आमची उत्कट इच्छा असावी .
मला येशूला जाणून घ्यायचे आहे. येशूला ओळखण्याची वेळ आली आहे, जर येशूला ओळखले तर तुम्ही बलवान व्हाल. कोणत्याही कारणाने तुमची फसवणूक होणार नाही. आज मंडळी फसली जात आहेत. बऱ्याच उपदेशकानां आज देवाचे ज्ञान नाही, ते येशूला ओळखत नाहीत. आज चिन्हे-चमत्कारांच्या मागे धावण्यापेक्षा येशूला अधिक जाणून घेण्याची आवड तुमच्यामध्ये निर्माण करण्याची गरज आहे, केवळ दृष्टान्त आणि स्वप्नांनसाठीच नव्हे तर दररोज बायबलमधील प्रत्येक पानातून , देवाच्या वचनातून येशूचे नवीन प्रकटीकरण मिळण्याची इच्छा असणे आवश्यक आहे .आणि ते प्रकटीकरण माझ्या जीवनाचा भाग बनयाला हवे . येशूचे जीवन आपली आत्मिक भूक भागवते.
चिन्हे आणि चमत्कारांच्या मागे धावण्यापेक्षा आपण येशू ख्रिस्ताच्या प्रकटीकरणात वाढले पाहिजे. जर आपण येशूचे अनुसरण केल्यास, मग चिन्हे आणि चमत्कार आमच्या मागे येतील. आपल्यामध्ये चिन्हे आणि चमत्कार बरोबर आम्ही नम्रपणा असावा .आणि आपली प्राथना अशी असावी कि , चिन्हे आणि चमत्कार नाही, परंतु मला प्रभु तुला जाणून घ्यायचे आहे. सर्वात मोठा चमत्कार हा आरोग्य किंवा चिन्हे नसून,तर टिकून रहाणारा चमत्कार म्हणजे तारण होय. म्हणून आरोग्य मिळो अथवा न मिळो तारण आपलंस करून घ्या .
जर
आपण या शिक्षणा द्वारे आशीर्वादित झाला असाल तर जरूर आपल्या प्रियजनास शेअर करा .
👇 या व्हिडीओतून देखील खोट्या संदेष्ट्या बद्दल अधिक इशारा बद्दल ऐकण्यास मिळेल .
What the Bible says about Day of the Dead मृतदिन बद्दल पवित्रशास्र काय सांगते ? 👈 या लेखातून देखील आपणास चुकीच्याशिक्षणा बद्दल वाचण्यास मिळेल.