Holy Bible, पवित्र शास्त्र,बायबल अभ्यास
पवित्र शास्त्र
बायबल अभ्यास
प्रस्तावना
पवित्र शास्त्र हे ख्रिस्ती जीवनाचे परमेश्वरप्रेरित पाठ्यपुस्तक असून मार्गदर्शकही आहे. एवढेच नव्हे, तर त्याद्वारे देवाने मनुष्याला स्वतःचे प्रकटीकरणच केलेले आहे. तारण प्राप्त करून घेण्यासाठी व ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी आवश्यक ते सर्व पवित्र शास्त्रात सांगितलेले आहे.
पवित्र शास्त्राला इंग्रजीत बायबल म्हणतात, या इंग्रजी शब्दाचा ग्रीक भाषेतील मूळ शब्द बिब्लोस असून याचा अर्थ ग्रंथ असा आहे.
पवित्र शास्त्रात बायबल ग्रंथला
१.शास्त्र- मत्तय. २२:२९
२.पवित्र शास्त्र - रोम.१:२
३. ईश्वरप्रेरित शास्त्रलेख - २ तीमथ्य. ३:१६
४. देवाचे वचन - इब्री. ४:१२ अशी निरनिराळी नावे दिली आहेत.
![]() |
पवित्र शास्त्र , बायबल |
१. पवित्र शास्त्राचे दोन विभाग आहेत
१. जुना करार २. नवा करार.
करार म्हणजे काय ?
करार या शब्दासाठी जुन्या करारात 'बेरीट' हा शब्द आणि नव्या करारात 'डायथेके' हा शब्द वापरला आहे. त्यावरून दोन पक्ष अथवा गटांमधील (एकमेकांच्या वतीने करण्यात आलेला) 'तह' किंवा 'करार' किंवा 'बोलाचाली' निर्देशित होते. हा करार परस्परांवर बंधनकारक असतो. ईश्वरवैज्ञानिक दृष्ट्या, म्हणजे देव आणि मानव यांच्या संदर्भात याचा अर्थ असा आहे की, देव दयाळूपणे, मानवाच्या भल्यासाठी व मानवाला आशीर्वाद देण्यासाठी, विशेषतः जे लोक विश्वासाने त्याची वचने स्वीकारतात आणि त्या कराराच्या अटी पाळण्याचे कबूल करतात त्यांच्यासाठी या करारात सामील होतो.
'बेरीट' शब्दाचा मूळ अर्थ 'बंधन' किंवा 'बंधनकारक' असा आहे. दोन गटांमधील संबंध- ज्याद्वारे एक गट दुसऱ्या गटासाठी काहीतरी सेवा करण्यास ,कर्तव्य पार पाडण्यास स्वतःला बांधून घेतो. यात देव आपली पवित्र इच्छा जाहीर करतो. म्हणजेच त्याला लोकांवर आपली कृपा करायची आहे. ही कृपा प्राप्त झालीच पाहिजे अशी मनुष्याची पात्रता नाही, पण तो ती विश्वासाने प्राप्त करून घेऊ शकतो तसेच तो देवाला वैयक्तिक समर्पण करून, कराराच्या अटी पूर्णतः पाळण्यासाठी स्वतःला बांधून घेतो. देव आणि मानव यांच्यामधील परस्पर संबंधाचे लक्षण, “ मी त्यांचा देव होईल व ते माझे लोक होतील ” यिर्मया ११:४ या वचनात आढळते.
पवित्र शास्त्राचे दोन्ही करार येशू ख्रिस्त या एकाच अद्वितीय व्यक्तीवर केंद्रित आहेत. मनुष्याच्या पापांची क्षमा ही येशू या निर्दोष कोकऱ्याच्या रक्तसिंचनानेच होऊ शकते हे पवित्र शास्त्राचे अंतिम सत्य आहे.
जुन्या करारातील पुस्तकांची विभागणी
नियमशास्त्र ५ पुस्तके उत्पत्ती, निर्गम, लेवीय, गणना, अनुवाद.
इतिहास १२ पुस्तके यहोशवा, शास्ते, रूथ, १ शमुवेल, २ शमुवेल, १ राजे, २ राजे, १ इतिहास,
२ इतिहास, एजा, नहेम्या, एस्तेर.
कविता / काव्य ६ पुस्तके ईयोब, स्तोत्रसंहिता, नीतिसूत्रे, उपदेशक, गीतरत्न, विलापगीत.
भविष्यसूचक १६ पुस्तके यशया, यिर्मया, यहेज्केल, दानीएल, होशेय, योएल, आमोस, ओबद्या, योना, मीखा, नहूम, हबक्कूक, सफन्या, हाग्गय, जखऱ्या, मलाखी.
जुना करार व नवा करार यांच्यामध्ये चारशे वर्षांचा मौनकाळ आहे. कारण या काळात मानवाला देवाकडून
कोणताच संदेश मिळाला नाही.
नव्या करारातील पुस्तकांची विभागणी
इतिहास ५ पुस्तके चार शुभवर्तमाने : मत्तय, मार्क, लूक, योहान व प्रेषितांची कृत्ये.
पत्रे २१ पुस्तके पौलाने लिहिलेली पत्रे : रोमकरांस पत्र, करिंथकरांस पहिले पत्र, करिंथकरांस दुसरे पत्र, गलतीकरांस पत्र, इफिसकरांस पत्र, फिलिप्पैकरांस पत्र, कलस्सैकरांस पत्र, थेस्सलनीकाकरांस पहिले पत्र, थेस्सलनीकाकरांस दुसरे पत्र, तीमथ्याला पहिले पत्र, तीमथ्याला दुसरे पत्र, तीताला पत्र, फिलेमोनाला पत्र. इतरांनी लिहिलेली पत्रे : इब्री लोकांस पत्र (लेखक अज्ञात) याकोबाचे पत्र, पेत्राचे पहिले पत्र, पेत्राचे दुसरे पत्र, योहानाचे पहिले पत्र, योहानाचे दुसरे पत्र, योहानाचे तिसरे पत्र, यहूदाचे पत्र.
भविष्यसूचक १ पुस्तक योहानाला झालेले प्रकटीकरण
थोडक्यात पवित्राशास्राची रूपरेखा, बायबल स्टडी
प्रभू येशुख्रिस्त व ख्रिस्ताद्वारे तारण हा पवित्र शास्त्राचा मुख्य विषय आहे. मनुष्याची मूळ परिस्थिती कशी होती, त्याचे पतन झाल्यावर परिस्थिती कशी बदलली, देवपित्याने त्याच्या पुत्राला पृथ्वीवर पाठविण्याची तयारी कशी केली, हे सर्व जुन्या करारात सांगितले आहे. देवाने आपल्या संदेष्ट्यांच्या द्वारे ख्रिस्ताचा जन्म, जीवन, मरण व पुनरुत्थान यांविषयी भाकीत करून सांगितले. नव्या करारातील चार शुभवर्तमानात आपल्याला प्रभू येशु ख्रिस्ताचे जविनचरित्र वाचायला मिळते. प्रेषितांची कृत्ये या पुस्तकात प्रेषितांची कार्ये आणिमंडळीची स्थापना व वाढ कशी झाली हे सांगितले आहे. नव्या करारातील पत्रांमध्ये तत्त्वे व संप्रदाय यांचा पाया आढळतो. प्रकटीकरण या शेवटच्या पुस्तकात सर्व इतिहास हा ख्रिस्तामध्ये कसा पूर्ण होईल हे भविष्य सांगितले आहे. जुन्या करारातील वचने ख्रिस्तामध्ये पूर्ण होतात हे स्पष्टपणे कळून येते.
नव्या कराराशिवाय जुना करार अपूर्ण आहे, त्याचप्रमाणे जुन्या कराराशिवाय नव्या कराराचा अर्थ स्पष्ट होत नाही. देवाचे ज्ञान संपादन करण्यासाठी मनुष्याला संपूर्ण पवित्र शास्त्राची माहिती असलीच पाहिजे .
२. पवित्र शास्त्र कोणी
लिहिले ? / बायबल ग्रंथ कोणी लिहिला
पवित्र शास्त्र हे प्रत्येक परमेश्वरप्रेरित आहे .
२ तीमथ्य. ३:१६ - “प्रत्येक परमेश्वरप्रेरित शास्त्रलेख,सद्बोध,दोष दाखवणे.सुधारणक नीतीशिक्षण ह्याकरिता उपयोगी आहे.” “प्रेरित” हा शब्द 'थिओपेनेस्टस' या ग्रीक शब्दापासून आला आहे. याचा अर्थ “देवाने श्वास घातला” किंवा “श्वास सोडला” असा होतो. तो स्वतःच्या इच्छेचे “प्रकटीकरण” करून स्वतःला प्रगट करतो. कारण संदेश मनुष्याच्या इच्छेने कधी आला नाही, तर पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या मनुष्यांनी देवापासून आलेला संदेश सांगितला आहे. “प्रेरित” म्हणजे वारा जसा जहाजाला वाहवत नेतो तसे आत्म्याच्या द्वारे चालविले जाणे होय. त्यामुळे देवाने जे सांगितले व जे प्रगट केले ते पवित्र शास्त्र होय.
पवित्र शास्त्राच्या पहिल्या पाच पुस्तकांचा लेखक मोशे याला तो जे लिहीत होता ते देवाचे वचन आहे हे माहीत होते. “जी आज्ञा मी तुम्हांला देत आहे तिच्यात काही अधिकउणे करू नका” अनु.४:२.
आपण २ शमु.२३:२ मध्ये वाचतो की.“परमेश्वराचा आत्मा माझ्याद्वारे म्हणाला, त्याचे वचन माझ्या जिव्हेवर आले. १ करिंथमध्ये पौल म्हणतो, "ते आम्ही मानवी ज्ञानाने शिकवलेल्या शब्दांनी नव्हे,तर आत्म्याने शिकवलेल्या शब्दांनी सांगतो.” पवित्र शास्त्र देवाचे वचन आहे, कारण पवित्र आत्म्याने ते माणसांना दिले
आहे. पवित्र शास्त्रात, “परमेश्वर असे म्हणतो” असा उल्लेख पवित्र शास्त्राच्या लेखकांनी ३८०८ वेळेस केला आहे. पवित्र शास्त्राच्या लेखकांनी २६०० वेळा त्यांचे लिखाण देवाच्या प्रेरणेने लिहिण्यात आले असे नमूद केले आहे.मत्तय.२४:३५ मध्ये येशूने म्हटले, “आकाश आणि पृथ्वी नाहीतशी होतील,पण माझे वचन नाहीसे होणार नाही. १ पेत्र.१:२३ हे वचन सांगते की, कारण तुम्ही नाशवंत बीजापासून नव्हे, तर अविनाशी बीजापासून म्हणजे देवाच्या जिवंत व टिकणाऱ्या शब्दाच्याद्वारे पुन्हा जन्म पावलेले आहा.” योहान.६:६३, “मी जी वचने तुम्हांला सांगितली आहेत ती आत्मा व जीवन अशी आहेत.”
विविधतेत एकता
पवित्र शास्त्र हा अद्वितीय ग्रंथ आहे. त्यात ३९ जुन्या कराराची आणि २७ नवीन कराराची अशी एकूण ६६ पुस्तके आहेत. जवळजवळ १६०० वर्षांपर्यंत त्याचे लिखाण चालू होते,त्या दरम्यान ६० पिढ्या होऊन गेल्या. त्याचे चाळीसहून अधिक लेखक होते व प्रत्येकजण वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आले होते.
लिखाणाची मुळ भाषा
जुन्या करारातील बहुतेक सर्व पुस्तके हिबू भाषेत लिहिली आहेत.
एज्रा ४:८–६:१८; ७:१२-२६; यिर्मया १०:११; दानीएल २: ४-७:२८ हे भाग अरेमिक भाषेत लिहिले आहेत. नव्या करारातील पुस्तके ग्रीक भाषेत लिहिली आहेत.
यात वेगवेगळ्या प्रकारचे लिखाण असूनही त्यात मूलभूत ऐक्य आहे. पवित्र शास्त्र मानवी शरीरासारखे असून त्यात जैविक ऐक्य आहे. सर्व भागांचा संदर्भ लक्षात घेतल्याशिवाय आपणास एखादा भाग समजू शकत नाही.
३. ईश्वरी प्रेरणा
दैवी सत्य अचूक व स्पष्ट लिहिण्यासाठी देवाने पवित्र शास्त्राच्या लेखकांवर व त्यांच्या लेखनावरही नियंत्रण ठेवले. मनुष्य आपले विचार इतरांना अचूक व स्पष्टपणे सांगण्याचा प्रयत्न करतो, तरी त्याला त्यात संपूर्ण यश मिळेल, अशी खात्री नसते. म्हणून गैरसमज होण्याचा संभव असतो. कारण बोलणारा व ऐकणारा दोघेही अपूर्ण आहेत.
देवाने माणसांकडून आपले शास्त्र लिहवून घेतले, तेव्हा ही अडचण उद्भवली नाही कारण देवाच्या प्रेरणेने सर्व लिहिले गेले. पौल तीमथ्याला काय म्हणतो ? " संपूर्ण पवित शास्त्र आपल्याला देवाच्या प्रेरणेने देण्यात आले आहे " २तीमथ्य, ३:१६. “संपूर्ण" या शब्दाला येथे फार महत्त्व आहे.
पवित्र शास्त्रातील काही भाग सत्य व देवाच्या प्रेरणेने लिहिले गेले आणि काही भाग मानवी विचाराचे आहेत, असे म्हणणे चुकीचे आहे.
आपण देवाच्या प्रेरणेने लिहीत आहो हे लेखकालाही कधी कधी समजले नसेल.देवाने असे कार्य केले की, त्याने त्याचे विचार लेखकाच्या मनामध्ये प्रेरित केले. लेखकांनी हे विचार अचूकपणे लिहावेत म्हणून योग्य ते शब्द पवित्र आत्म्याने त्यांना सुचवले. जेव्हा जेव्हा देवाला आपला संदेश मनुष्याला सांगायचा होता, तेव्हा तेव्हा त्याने याच प्रकारे प्रेरणा दिली.
२ इति.१५:१-२ “मग देवाच्या आत्म्याने ओदेदाचा पुत्र अजय यास स्फूर्ति दिली; तो आसाच्या भेटीस जाऊन त्यास म्हणाला
२ पेत्र. १:२१ पेत्र म्हणतो , “संदेश मनुष्यांच्या इच्छेने कधी आलेला नाही, तर पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या मनुष्यांनी देवापासून आलेला संदेश सांगितला आहे.
पवित्र शास्त्राच्या संदर्भात देवाने लेखकांचे व्यक्तिमत्त्व, ग्रहणशक्ती व अनुभव या सर्वांचा उपयोग केला आणि त्यांच्याकडून स्वतःचे सत्य योग्य शब्दांत व वाक्यात लिहवून घेतले. लेखकांनी उपलब्ध माहितीचा आधार घेतलाच आहे. उदा. वंशावळी- तथापि पवित्र आत्म्याने चुकीची अशी कोणतीच माहिती लिहू दिली नाही. पवित्र आत्म्याने लेखकांच्या मनात योग्य माहिती, विचार व वाक्ये आणली.
जुन्या कराराच्या काळात यहूदी लेखकांनी अतिशय काळजीपूर्वक प्रती तयार केल्या. तेव्हापासून पंधराव्या शतकापर्यंत जुन्या व नव्या कराराच्या प्रती हाताने तयार केलेल्या होत्या. देवाने पवित्र आत्म्याच्या द्वारे लेखकांना प्रेरणा दिली, तरी त्याने आपले सत्य स्वतः जतन केले आहे. शास्त्रलेखांच्या प्राचीन काळच्या ज्या गुंडाळ्या सापडल्या आहेत त्या याचा पुरावाच आहेत,कारण त्यात साम्य व अचूकपणा दिसून येतो. परंतु पवित्र शास्त्राची भाषांतरे मात्र ईश्वरप्रेरित नाहीत. देवाच्या लोकांपैकी विद्वान लोकांनी सखोल अभ्यास करून देवाचे सत्य वचन अचूकपणे लिहिले. या कार्यात पवित्र आत्म्याने त्यांना मार्गदर्शन केले.
प्रकटीकरण, प्रेरणा आणि प्रकाशन या तीन संज्ञांमधील भेद आपण समजून घ्यायला हवा.
१. प्रकटीकरण - प्रकटीकरण म्हणजे देव मनुष्याच्या असहाय आणि शोधून काढण्यास असमर्थ अशा मनाला, पूर्वी ठाऊक नसलेले सत्य, ज्या कृतीद्वारे व्यक्त करतो त्या कृतीला प्रकटीकरण म्हटले जाते.
२.प्रेरणा - प्रेरणा म्हणजे दैवी सामर्थ्य किंवा प्रभाव,ज्याद्वारे वक्त्याला किंवा लेखकाला पूर्वी ज्ञात वा अज्ञात असलेले सत्य अचूकरीत्या व्यक्त केले जाते त्याला प्रेरणा म्हणतात
३. प्रकाशन अथवा प्रकाशित होणे - प्रकाशन म्हणजे मानवी मनाची दैवी जागृती. जिच्यामुळे आधीच प्रकट झालेले सत्य समजून घेता येते. आधीच प्रकट झालेले सत्य म्हणजे पवित्र आत्म्याची शिकवण.
४ पवित्र शास्त्राचा अधिकार
पवित्र शास्त्र हे देवाचे वचन आहे. जुन्या कराराच्या काळात यहूदी लोक (देवाचे निवडलेले राष्ट्र) नियमशास्त्राच्या सत्तेने बांधलेले होते. देवाने मोशेच्या द्वारे त्यांना नियमशास्त्र दिले म्हणून त्यातील सर्व नियम पाळणे हे त्यांचे कर्तव्य होते. देवाने निवडलेल्या माणसांच्या द्वारे पवित्र शास्त्र लिहून घेतले आणि आपल्या हाती सोपविले म्हणून आपण ख्रिस्ती लोक त्याच्या अधिकाराखाली आहोत. आपल्या ख्रिस्ती जीवनात पवित्र शास्त्र अंतिम निर्णय देणारे असून ते सत्याचा ठेवा आहे. जीवन आणि मरण यांविषयीच्या प्रश्नांची उत्तरे स्पष्टपणे देणारा ग्रंथ म्हणजे आपले पवित्र शास्त्र. ही उत्तरे देवाच्या अधिकाराने दिली आहेत..
मात्र एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, देव पवित्र शास्त्राविरुध्द कधीही काही प्रगट करणार नाही.पवित्र शास्त्राविरुद्ध दिलेले शिक्षण खोटे आहे. शास्त्रातील सत्ये कधीही बदलत नाहीत.
आपल्याला शास्त्रातील सर्व गोष्टी समजत नाहीत, कारण मानवी विचारशक्ती मर्यादित आहे. ज्या गोष्टी आपल्या समजण्यापलीकडे आहेत त्या गोष्टी आपण विश्वासाने ग्रहण कराव्यात, कारण त्या देवाच्या अधिकाराने लिहिण्यात आल्या आहेत. या जगातील अनेक गोष्टी आपल्याला समजत नाहीत. अशा बाबतीत आपल्याला इतरांच्या सांगण्यावर व अधिकारावर विश्वास ठेवावा लागतो. आपण आपल्यासारख्याच अपूर्ण व दुर्बल मनुष्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवतो, तर परिपूर्ण, सर्वज्ञानी देवाच्या वचनावर विश्वास ठेवणे कठीण का जावे ? देवाचे वचन देवाच्या अधिकाराने बोलते असा विश्वास धरणे बरोबर आहे.
५ प्रमाणभूत पवित्र शास्त्रामधील पुस्तके
मोशेच्या काळापासून पुढील सोळाशे वर्षांत केवळ आपल्या पवित्र शास्त्रामधील सहासष्ट पुस्तके लिहिली गेली, असे नाही. उदा. आपल्या शास्त्रात केवळ चार शुभवर्तमाने आहेत,पण इतर अनेकांनी प्रभू येशू ख्रिस्ताचे चरित्र लिहिले,तरी केवळ चारच शुभवर्तमाने शास्त्रामध्ये समाविष्ट झाली आहेत. त्याप्रमाणे जुन्या कराराच्या काळात इतिहासाची अनेक 'पुस्तके' होती, पण ती सर्व जुन्या करारात समाविष्ट केली गेली नाहीत. ईश्वरप्रेरित पुस्तके कशी ओळखण्यात आली हे आपण पाहू या.
पुस्तक परमेश्वरप्रेरित आहे किंवा नाही, ही खरी कसोटी होती. हे ओळखण्यासाठी काही नियम वापरले गेले.जुन्या करारातील पुस्तकांना खालील कसोटी लावण्यात आली होती :
१. लेखक देवाच्या संदेष्ट्यांपैकी एक होता.
२. संदेष्ट्यांपैकी कोणीतरी ते पुस्तक संपादित केले.
३. संदेष्ट्यांपैकी कोणीतरी ते पुस्तक पुरस्कृत केले.
जी एकुणचाळीस पुस्तके आपल्या जुन्या करारात आहेत, ती पुस्तके या कसोटीस उतरली,म्हणूनच जुन्या करारात त्यांचा समावेश करण्यात आला.
प्रभू येशू ख्रिस्ताने जुन्या करारातील पुस्तकांना आपली मान्यता दिली.
लूक. २४:२७ - मग त्याने मोशे व सर्व संदेष्टे ह्यांच्यापासून आरंभ करून सगळ्या शास्त्रातील आपणाविषयीच्या गोष्टींचा अर्थ त्यांना सांगितला.
लूक.२४:४४- मग तो त्यांना म्हणाला,मी तुमच्याबरोबर असताना तुम्हांस सांगितलेली माझी वचने हीच आहेत की, मोशेचे नियमशास्त्र, संदेष्टे व स्तोत्रे यांत माझ्याविषयी जे लिहिलेले आहे ते सर्व पूर्ण होणे अवश्य आहे.
योहान.५:३९- तुम्ही शास्त्रलेख शोधून पाहता,कारण त्याच्या द्वारे तुम्हांला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल असे तुम्हांला वाटते आणि तेच माझ्याविषयी साक्ष देणारे आहेत.
जुन्या करारातील पुस्तके परमेश्वरप्रेरित सत्य आहेत, असे ख्रिस्ताने मान्य केले, हे वरील विधानांवरून दिसून येते.
जुन्या कराराच्या पुस्तकांना कोणी कसोटी लावली हे आपल्याला माहीत नाही ख्रिस्ताच्या काळाच्या आधी हे कार्य झाले होते.
नव्या करारातील पुस्तकांना खालीलप्रमाणे कसोटी लावण्यात आली :
१. प्रेषिताने लिहिले .
२.प्रेषितांनी त्या पुस्तकाला पुरस्कृत केले. उदा. मार्कने लिहिलेल्या शभवर्तमानास पेत्राने मान्यता दिली.
३. पुस्तकात ईश्वरी प्रेरणेची व अधिकाराची वैशिष्ट्ये दिसून येतात, असे प्रेषिताच्या काळात मानले गेले. आपल्या नव्या करारात सत्तावीस पुस्तके आहेत. त्यांना वरील कसोटी लावून नव्या करारात समाविष्ट केले आहे. ही कामगिरी पूर्ण करण्यास सुमारे तीनशे वर्षे लागली. नव्या करारातील पुस्तके इ. स. ५०-१०० या काळात लिहिली गेली. इ. स. १००-२०० या काळात वरील कसोट्या लावण्यात आल्या व त्यानंतर चौथ्या शतकात जी पुस्तके आपल्या नव्या करारात आहेत ती ईश्वरप्रेरित आहेत असे मान्य झाले. मानवी अधिकाराने किंवा बुद्धीने नव्हे, तर पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाप्रमाणे हे कार्य झाले. तसेच आपण पवित्र शास्त्र वाचतो,तेव्हा हे सत्य आहे ही खात्री पवित्र आत्मा आपल्या अंतःकरणास पटवून देतो.
६ देवाच्या वंचनाचे वर्णन करणारी रूपके
दिलेल्या रूपकांवरून आपल्याला देवाच्या वचनाची कार्ये समजून येतात.
१. अग्नी ; यिर्मया २३:२९ - माझे वचन अग्नीसारखे ... नव्हे काय ? देवाचे वचन विश्वासणाऱ्यामधील कलंक भस्म करते.
२. हातोडा ; यिर्मया २३:२९ - माझे वचन ... खडकाला फोडून तुकडे तुकडे करणाऱ्या हातोड्यासारखे नव्हे काय? देवाच्या वचनाने पापी मनुष्याचे कठीण अंतःकरण फोडले जाते. तो नम्र होऊन देवाच्या चरणांजवळ येतो.
३. दिवा ; स्तोत्र. ११९:१०५ - तुझे वचन माझ्या पावलांकरिता दिव्यासारखे व माझ्या मागावर प्रकाशासारखे आहे. देवाचे वचन आपल्याला तारणाचा मार्ग दाखविते व त्याविषया मार्गदर्शन करते.
४. अन्न ; १ करिंथ.३:२ - मी तुम्हांस दूध पाजले,जड अन्न दिले नाही. १ पेत्र. २:२ - तारणासाठी तुमची आध्यात्मिक वृद्धी व्हावी म्हणून ...निऱ्या दुधाची इच्छा धरा. इब्री.५:१४- तुम्हांला कधीही जड आध्यात्मिक अन्नाचे सेवन करता येणार नाही व देवाच्या वचनातील गूढ गोष्टी समजणार नाहीत. देवाच्या वचनाद्वारे आपल्या आध्यात्मिक जीवनाचे पोषण होते.
५. तरवार ; इब्री. ४:१२ -देवाचे वचन सजीव, सक्रिय, कोणत्याहि दुधारी तरवारीपेक्षा तीक्ष्ण ... असे आहे. देवाच्या वचनाने पापांची जाणीव निर्माण होते. आपले विचार, भावना, उद्देश ही बरोबर आहेत किंवा नाहीत हे समजते.
६. परीक्षक ; इब्री. ४:१२ - देवाचे वचन ....मनातील विचार व हेतु ह्यांचे परीक्षक असे आहे. योग्य व अयोग्य काय आहे हे आपल्याला देवाच्या वचनाद्वारे समजून येते.
७. बीज ; १ पेत्र.१:२३ - देवाच्या जिवंत व टिकणाऱ्या शब्दाच्या द्वारे पुन्हा जन्म पावलेले आहा. देवाच्या जिवंत व सदासर्वकाळ टिकणाऱ्या वचनाद्वारे मनुष्याचा पुन्हा जन्म होतो.
८. आरसा ; याकोब. १:२३ ते २५ - कारण जर कोणी वचन नुसते ऐकून घेतो व त्याप्रमाणे आचरण करीत नाही, तर तो आरशात आपले शारीरिक मुख पाहणाऱ्या माणसासारखा आहे
देवाच्या वचनाद्वारे मनुष्याची खरी परिस्थिती दिसून येते. आपण आरशात पाहतो तेव्हा विस्कटलेले केस व्यवस्थित करतो, तोंडावर पडलेला डाग काढून टाकतो, त्याप्रमाणेच देवाच्या वचनाने दाखवलेली पापे आपण सोडून दिली पाहिजेत. आपल्या चुका सुधारल्या पाहिजेत.
७ . पवित्र शास्त्राचा उलगडा कोणाला होतो ?
१. ज्यांचा नव्याने जन्म झाला आहे असे विश्वासणारेच देवाचे सत्य जाणू शकतात असे १ करिंथ २:१४ हे वचन सांगते. (इतर का नाही? १ करिंथ.२:९-११ वाचा.) देवाविषयीचे ज्ञान माणसाला हवे असेल, तर त्याच्याठायी पवित्र आत्म्याची वसती असणे आवश्यक आहे. आध्यात्मिक दृष्ट्या जी व्यक्ती अविश्वासणारी आहे ती व्यक्ती देवाच्या वचनातील सत्य समजू शकत नाही (योहान.८:४४,४५).
![]() |
bible-reading |
२. एखादी उत्सुक व्यक्ती पवित्र शास्त्राचाअभ्यास करू शकते. प्रेषित. १७:११,१२;
३. देवाच्या वचनाचा अभ्यास करण्याची इच्छा असणे जरुरीचे आहे. १ पेत्र २;२ "नुतन जन्मलेल्या बालकांसारखे वचनरुपी निऱ्या दुधाची इच्छा धरा.” पर्वत समुळ उलथून टाकून लोक चांदीचा शोध घेतात असे ईयोब सांगतो. परंतु सत्य शोधण्यासाठी मात्र लोक प्रयत्न करीत नाहीत ईयोब २३:१२.
४. देवाच्या वचनाचा अभ्यास करण्यासाठी पावित्र्य अत्यंत आवश्यक आहे. १ पेत्र २:१ याकोब १:२१.
५. पवित्र आत्मा देवाचे वचन शिकवणारा शिक्षक आहे म्हणून आमचे जीवन आत्म्याने नियंत्रित असणे आवश्यक आहे. १योहान.२:२०,२७.
सारांश
१. पवित्र शास्त्र हे देवाने मनुष्याला केलेले स्वतःचे प्रकटीकरण आहे.
२. संपूर्ण पवित्र शास्त्र देवाच्या आज्ञेनुसार,त्याच्या प्रेरणेने लिहिले गेले.
३. पवित्र शास्त्र देवाचे सत्य वचन आहे.
४. देवाने पवित्र शास्त्राच्या लेखकांकडून त्याचे सत्य वचन अचूक व स्पष्ट लिहून घेतले.
५. पवित्र शास्त्राचा प्रमुख विषय ख्रिस्त आहे.
६. पवित्र शास्त्रामध्ये तारण प्राप्त करून घेण्यासाठी व ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी काय आवश्यक आहे ते सांगितले आहे.
७. ख्रिस्ती सिद्धान्त, तत्त्वे व आचार या गोष्टींविषयी पवित्र शास्त्राचा अंतिम अधिकार असून ते सर्व प्रश्नांचा निर्णय देणारे आहे.
८. कसोटी लावून देवाच्या प्रेरणेने लिहिलेली पुस्तके ओळखण्यात आली व ती पवित्र शास्त्रामध्ये समाविष्ट केली आहेत.
९. भाषांतरे जरी ईश्वरप्रेरित नाहीत तरी ती काळजीपूर्वक व पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे करण्यात आली आहेत..
१०. देवाचे वचन मनुष्याच्या जीवनात कार्य करते.
११. पवित्र शास्त्राचे शिक्षण मान्य केल्याशिवाय प्रामाणिकपणे शोध करणाऱ्याला सत्य सापडत नाही.
हे बा्इबल अाभ्यासच्या द्रुष्टिने खुप चांगले अाहे अाणि अाशीच माहिती पाठवा अाणि अाता ही जी टिप्पणी पाठवली त्या बद्दल मनापासून धन्यवाद
PRAISE THE LORD,
THIS DOCUMENTARY IS FROM SOUND CHRISTIAN DOCTRINE AND SO BEAUTIFULLY ARRANGED ,IT'S SET-UP IS SO UNIQUE AND GREATLY HELPFUL TO ALL TYPES OF PEOPLE ,IT'S ONE OF THE GIFT TO MARATHI READERS.......
MAY THE DEAR LORD BLESS REV. PR.DEEPAK SHELKE PALAK SAHEB .....
Thanks.