Merry Christmas ख्रिसमसच्या शुभेच्छा
Merry Christmas...
ख्रिसमसच्या शुभेच्छा

Merry christmas

नाताळच्या शुभेच्छा.......
ख्रिसमस हा केवळ उत्सव नाही तर ,तुमच्या आयुष्यात महान संदेश देणारा दिवस आहे.
सर्वप्रथम तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा. बरं, ख्रिसमस म्हणजे काय ? काही लोंकाना वाटते की, नाताळ म्हणजे सांताक्लॉज, मिठाई किंवा ख्रिस्ती लोकांचा हा सण. नाताळ हा केवळ सण नाही तर, प्रत्येक मानवासाठी महत्त्वाचा संदेश देणारा दिवस आहे. काय आपणास हा संदेश जाणून घ्यायचा आहे का ? मला वाटतं तुम्ही हा संदेश जाणून घ्यायला हवा.... कारण ते तुमच्या जीवनाशी निगडीत आहे.
ख्रिसमस म्हणजे काय ?
ख्रिसमस हा दिवस आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या जन्माची आठवण म्हणून साजरा केला जातो. पण तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, येशू ख्रिस्ताचा जन्म जगावर राज्य करण्यासाठी, गर्दी जमवण्यासाठी किंवा लोकप्रिय होण्यासाठी नाही तर बलिदान होण्यासाठी झाला होता. आता तुम्हास प्रश्न पडला असेल ? काय ? बलिदान होण्यासाठी कोणी जन्म घेतो का ? तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे. याचे उत्तर जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहे कारण एक सामान्य विचारधारा आहे की, देवाचा जन्म वाईटाचा नाश करण्यासाठी होतो. परंतू प्रभूयेशूचा जन्म बलिदान होण्यासाठी झाला होता.
प्रभुयेशूचा जन्म का झाला ?
येशू ख्रिस्ताचा जन्म ही काल्पनिक कथा किंवा अचानक घडलेली घटना नाही तर ही एक ऐतिहासिक घटना आहे.शिवाय येशूच्या जन्माविषयी हजारो वर्षांपूर्वी अनेक भविष्यवाण्या देखील करण्यात आल्या होत्या. देवाने हे जग अतिसुंदर निर्माण केले. कोणतीही कमतरता नव्हती, द्वेष नाही, भांडण नाही, लबाडी नाही, आजार नाही. परंतु मानव जात आज याच दु:खातून जात आहे. बायबल म्हणते की पापामुळे मनुष्य देवापासून वेगळा झाला. पापाने माणसाला कठोर केले त्यामुळे जगाचा ऱ्हास होत आहे. बायबल म्हणते की आपण सर्वांनी पाप केले आहे. आता जोपर्यंत मनुष्य या पापातून मुक्त होत नाही तोपर्यंत जगात दुष्प्रवृत्ती वाढतच जाईल आणि वैयक्तिक जीवनातही असुरक्षितता जाणवत राहील. अनेकवेळा आपण निराश होतो आणि आयुष्यातून हात धुवायचे ठरवतो. पण तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
येशू ख्रिस्ताचा जन्म यासाठीच झाला की, आपण पापापासून मुक्त व्हावे आणि पुन्हा देवासोबत नातेसंबंध जोडावेत. पण कसे ?
येशू तुमच्यासाठी मरण पावला.
होय ! बायबल म्हणते की पापाचे वेतन मृत्यू आहे. परंतु प्रेमळ देवबाप त्याच्या मुलांना मृत्यूची शिक्षा कशी देऊ शकतो ? म्हणूनच, माझ्या व तुमच्या पापांची क्षमा करण्यासाठी येशू आमच्या जागी वधस्तंभी गेला ,जेणेकरून आमच्या पापाच्या शिक्षेपासून आमची सुटका व्हावी. त्याच्या डोक्यावर काट्याचा मुकुट चढवण्यात आला, त्याच्या हाता-पायात खिळे ठोकले गेले. येशूने आपणास पापापासून मुक्त करण्यासाठी एक वेदनादायक स्वता:चे बलिदान दिले. म्हणूनच मी म्हणालो की येशूचा जन्म मरण्यासाठी झाला होता.
कधी आपणास असा विचार आला होता का ? की, देव स्वतः मानव म्हणून येईल आणि स्वतःच बलिदान होईल? होय..! हेच येशूचे प्रेम आहे. त्याच्या मृत्यूने आपणास आपल्या पापांची क्षमा मिळते आणि येशू ख्रिस्त आपणास नवजीवन मिळावे यासाठी तिसऱ्या दिवशी मृत्यूतून पुन्हा उठला.
ख्रिसमस भेट
हा संदेश समजून घेणे हीच ख्रिसमची सत्यता आहे. मी तुम्हाला येशू ख्रिस्त आणि त्याचे बलिदान स्वीकारण्यासाठी मनापासून आमंत्रित करतो जेणेकरून तुम्हाला तुमच्या पापांची क्षमा होईल.
येशूने म्हटले “मार्ग,सत्य व जीवन मीच आहे”. आणि जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला अनंतकाळचे जीवन आहे. जर तुम्ही येशूला तुमच्या जीवनात स्वीकारले तर तुमचे जीवन बदलेल आणि तुम्हाला अनंतकाळचे जीवन मिळेल.
जर आपण येशूला खऱ्या मनाने स्वीकारु इच्छित असाल , तर खालील प्रार्थना करून येशूला आपल्या अंतकरणात आमत्रित करा . येशू तुमच्या हृदयाच्या दाराशी उभा आहे आणि तो नक्कीच तुमची प्रार्थना ऐकेल आणि तुमचा स्वीकार करेल.
प्रार्थना
प्रभू मी पापी आहे आणि मी स्वतःला वाचवू शकत नाही. मी तुझे आभार मानतो की तू मला वाचवण्यासाठी येशूला जगात पाठवलेस. माझा विश्वास आहे की येशू ख्रिस्त, माझ्या सर्व पापांचा दंड भरण्यासाठी वधस्तंभावर मरण पावला. आणि तीन दिवसांनंतर तो मेलेल्यातून उठला. येशू, मला क्षमा करा आणि मला वाचवा. आमेन.
Prayer helpline No.9270047316