देव राज्यावर आक्रमण, Kingdom of God
देव राज्यावर आक्रमण
![]() |
देव राज्यावर आक्रमण |
देव आणि सैतान हे परस्पर विरोधी आहेत. ज्या लोकांवर सैतान राज्य करतो ते दैहीक गोष्टींमागे असतात, जग आणि जगाच्या गोष्टीच त्यांचे जीवन बनून जातात.
“देवाचे राज्य” म्हणजे जेथे देवाची इच्छा पूर्ण होते. देव राज्य करतो म्हणजेच त्याचे प्रभुत्व तेथे असते. जेथे देवाचेच गौरव असते.
आज या देवाच्या राज्यावर शत्रू सैतान खुप प्रमाणात आणि वेगवेगळ्या प्रकारे आक्रमण करत आहे. मंडळी हे देवाच्या राज्यातील अगदी महत्त्वाचा घटक, या मंडळीद्वारे देवाचे राज्य वाढत आहे.
शत्रु सैतान हे अगदी चांगले जाणुन आहे की, मंडळीवर आक्रमण म्हणजे देवाच्या राज्याचे नुकसान, म्हणुन तो पुरेपूर प्रयत्न करून आज मंडळीत तट-फुटी, भांडणतंटे आणि गैरसमज उत्पन्न करण्याचा प्रयत्न करत आहे, आणि काही अंशी तो यशस्वी देखील होत आहे. किती ही खेदाची बाब !
सैतान हे कसे करतो ?
आमचा इगो म्हणजेच अहंकार दुखावला जातो (प्रत्येकात तो आहेच), आम्ही मंडळीत एकमेकांकडून कळत नकळत दुखावणारच कारण आमच्या आवडी-निवडी आणि कार्यपद्धती वेगवेगळ्या असू शकतात, जरुरी नाही की वेगवेगळ्या म्हणजे चुकीच्याच, जो पर्यंत आम्ही देवाच्या वचनाच्या चाकोरीत आहोत तो पर्यंत त्या चुकीच्या ठरत नाही. आमच्या इच्छेप्रमाणे झाले नाही की आम्ही बंड करतो. कधी कधी तर समस्येपेक्षा आमचा इगोच मोठा असतो, म्हणुन आम्ही आडमुठेपणा दाखवत असतो.
मग ...
फारकत घेणे, दुरावा निर्माण करणे, संबंध तोडणे, हा योग्य पर्याय असू शकतो का ?
कारण ख्रिस्त तर जोडतो ! तोडण्याचे काम देवाचे कसे असू शकते ?
विश्वासणार्यांनी हे जाणून घेतले पाहिजे की या मागे शत्रू सैतान आहे.
आम्ही दुखावले जाणारच म्हणुनच तर देवाने त्याच्या वचनात कलसै३;१३ मध्ये आम्हाला क्षमा करणे, सहन करणे आणि एकमेकांचा स्विकार करणे शिकवले आहे. या सर्व गोष्टी विषनाशक antidote म्हणुन कार्य करतात. यांच्याशिवाय आमचे नातेसंबंध कधीच टिकू शकत नाहीत. हे सर्व ख्रिस्ताने आमच्याबरोबर केले. त्याने आम्हाला क्षमा केली, आमचे सहन केले आणि आजही करतोय, आणि आमचा स्विकार केला....! दास म्हणुन नव्हे तर पुत्र म्हणुन.
यामुळेच तर आज आपण त्या दयेच्या आसनाजवळ जाऊ शकतो आहे.
चला तर मंडळी, शत्रूच्या कटकारस्थानाला ओळखून आम्ही देवाच्या वचनाला साजेसे जीवन जगत राहण्याचा निर्धार करू. जेंव्हा आमची सहनशक्ति , क्षमा करणे किंवा आणि स्विकार करणे कठीण वाटेल , तेंव्हा आम्ही त्यांच्या कृपेची मागणी करून विजयी ख्रिस्ती जीवन जगण्याचा प्रयत्न करतच राहूया.
देवराज्याचे नुकसान माझ्या कोणत्याही विचारांनी, वागण्याने आणि निवडीने होणार नाही याची खबरदारी आपण सतत बाळगली पाहिजे नाहीतर आमचा विश्वास व्यर्थ आणि ख्रिस्ती जीवनही व्यर्थच.
“मंडळी” ही देवराज्यातील महत्त्वाचा घटक आहे. देव मंडळीच्या द्वारे त्याच्या राज्याचा विस्तार करत आहे. शत्रु सैतान हे चांगले जाणुन असल्याने तो मंडळीवर म्हणजेच विश्वासणार्यांवर अतिशय धूर्तपणे आणि हुशारीने आक्रमण करत आहे. सर्वप्रथम तो विश्वासणार्यांना सहभागीतेपासुन तोडतो. देव आणि देवाच्या गोष्टी समजुन घेण्यापासून तो त्यांना दुर ठेवतो. परिणामी जग आणि जगाच्या गोष्टीं ह्या देवाच्या गोष्टींपेक्षा अधिक महत्त्वाच्या आणि गरजेच्या वाटु लागतात. यामुळे विश्वासणार्यांचे उद्देश्य आणि स्वप्नं हे देवाच्या इच्छेनुसार राहत नाहीत तर उलट त्याच्या विरुद्ध बनतात.
आमच्या गरजांचा परीघ वाढत जातो. वास्तव गरजा कधी अवास्तव होतात ते कळतच नाही आणि मग धावपळ, दगदग सुरु होते. कशासाठी ? नाशवंत गोष्टींसाठीच ना ?
अविनाशी गोष्टींकडे पाठ फिरवून आम्ही विनाशी गोष्टींच्या पाठीमागे असे लागतो की त्या गोष्टींच आमचे जीवन बनून जातात. देव फक्त नावाला राहतो. मंडळी फक्त ठराविक विधी आणि सणवार यांच्या पुरतीच बनून जाते.
- अशी जी
आमची मानसिकता झाली आहे, काय अशीच देवाची
योजना आणि इच्छा आहे ?
- विचार करा विश्वासणारे या नात्याने काय देवाने आम्हाला उपाशी ठेवले ?
- काय आम्ही उघडे-नाघडे आहोत ?
- काय आम्हाला निवारा नसुन रस्त्यावर आलो आहोत ? नाही ना ?
- जर देव आजपर्यंत विश्वासू राहिला आहे तर उद्या तो बदलेल का?
स्वतःला विचारा, ज्या नश्वर, लयास जाणार्या गोष्टींच्या मागे मी लागलो आहे, त्यासाठीच देवाने मला तारण दिले आहे का ? तारणानंतर काय माझे उद्देश्य आणि स्वप्नं बदललेली आहेत?
मी माझ्या आणि परिवाराच्या गरजा पूर्ण केल्याच पाहिजे हे देवाचे वचन शिकवते पण जर देवाच्या गोष्टींसाठी माझ्याकडे वेळच नसेल तर, काय मी योग्य दिशेने वाटचाल करत आहे ?
आज स्वतःला काही प्रश्न विचारा,
- शेवटी बायबल कधी वाचले होते ?
- मंडळी सोबत सहभागीता कशी आहे?
- देव राज्यासाठी अलीकडच्या काळात केलेले कार्य कोणते ?
- माझे शेवटचे दान आणि दशांश मी कधी दिले ?
या प्रश्नांची उत्तरे नक्कीच आपण देण्याचे टाळू कारण शत्रु फार धूर्तपणे आपल्याला त्याचा सावज बनवत आहे.
चला भावांनो आणि बहिणींनो, आज नव्याने आपले समर्पण देवाला करूया आणि पश्चाताप करुन मागे फिरूया. जर आपण हृदय कठीण केले तर देव राज्याचे नुकसान होणारच होणार.
👇 हा संदेश सुद्धा आपणास आशीर्वादास कारण होऊ शकतो.
सौम्य मार्गदर्शन 👈 वाचण्यासाठी क्लिक करा
मनुष्याने सगळे जग मिळवले आणि आपल्या आत्म्याचा नाश करुन घेतला तर त्याला त्याचा काय उपयोग ? मार्क ८;३६
द्वारे
पा. अभिजीत
शेलार,पुणे
Very nice
खुप छान