True Repentance खरा पश्चाताप

खरा पश्चाताप

    ' पश्चाताप '  याचा अर्थ पापापासून पूर्णपणे परावृत्त होणे , मागे वळणे ' असा आहे. पश्चाताप म्हणजे पापाचा त्याग करणे आणि पवित्र जीवन जगण्यासाठी पवित्र आत्म्याच्या साह्याचा स्वीकार करणे.

what-is-true-repentance
true-repentance


    तारणासाठी पश्चात्ताप आवश्यक आहे, कारण सर्वजण देवासमोर दोषी आहेत  मार्क,१:१५ - पश्चात्ताप करा.., हा प्रभू येशू ख्रिस्ताचा पहिला संदेश होता. लूक १३:३- पश्चात्ताप करीत नाहीत ते. नाश पावतील असेही ख्रिस्ताने सांगितले. देव सर्वांना पश्चात्तापकरण्याची आज्ञा करतो.

प्रेषित.१७:३० - परंतु आता सर्वांनी सर्वत्र पश्चात्ताप करावा अशी तो माणसांना आजा करतो. पश्चात्ताप केल्याशिवाय पापांची क्षमा मिळत नाही.

 लूक.२४:४७ - त्याच्या (ख्रिस्ताच्या) नामाने पश्चात्ताप व पापक्षमा घोषित करण्यात यावी. सर्वांनी पश्चात्ताप करावा अशी देवाची इच्छा आहे.

२ पेत्र.३:९ - कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही तर सर्वांनी पश्चात्ताप करावा अशी आहे. या जगात असेतोपर्यंत मनुष्याला पश्चात्ताप करण्याची संधी आहे. परंतु त्याने इकडे दुर्लक्ष केले किंवा जाणूनबुजून संधी गमावली तर त्याचा नाश अटळ आहे.

    पश्चात्ताप म्हणजे पापाविषयी दुःख वाटणे, अशी अनेक लोकांचा समज आहे. दुःख वाटणे,रडणे हा पश्चात्तापाचा केवळ एक भाग आहे. मला पुण्याला जायचे आहे आणि मी औरंगाबादच्या एस. टी. त बसलो तर मला पुण्याला पोचण्याची आशा नाही. मी चुकीच्या गाडीत बसलो याबद्दल मला खूप वाईट वाटले, खूप दुःख झाले, तरी मी उठून एस. टी. बदलेपर्यंत काही उपयोग होणार नाही. त्याचप्रमाणे पापाबद्दल केवळ दुःख करण्यात काहीच अर्थ नाही. केवळ पाप कबूल करून भागणार नाही, तर पाप करणे थांबविले पाहिजे आपण पापापासून माघारे वळले पाहिजे, पापाचा त्याग करून देवाच्या इच्छेप्रमाणे वागले पाहिजे.

  जेव्हा एखाद्याला खरा पश्चात्ताप होतो तेव्हा त्याच्या विचारात, वागण्यात बदल होतो. जेव्हा एखादी व्यक्ती म्हणतो की 'मला पश्चात्ताप होतो. परंतु जर त्याच्या जीवनांत काही बदल घडत नाही तर तो पश्चात्ताप खोटा असतो.

    जक्कय या व्यक्तिला पापाची जाणीव होऊन तो अगदी मनापासुन पश्चाताप करतो व कबुल करतो कि , प्रभूजी, पाहा, मी आपले अर्धे द्रव्य दरिद्र्यांस देतो, आणि मी अन्यायाने कोणाचे काही घेतले असेल तर ते चौपट परत करतो. येशूने त्याला म्हटले, “आज ह्या घराला तारण प्राप्त झाले आहे, कारण हाही अब्राहामाचा पुत्र आहे. प्रेषित. २६:१८ - त्यांनी अंधारातून उजेडाकडे व सैतानाच्या अधिकारातून देवाकडे वळावे.

 

पश्चात्ताप कृतीवरून व्यक्त होतो.आता पश्चात्तापास योग्य अशी फळे द्या" असे बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने सांगितले (लूक.३:८).पापापासून मागे वळणे व योग्य कृती करणे हे पश्चात्तापाचे मापन होय.

 पश्चात्ताप हे देवाचे दान आहे

प्रेषित.११:१८ - देवाने परराष्ट्रीयांसहि जीवन मिळावे म्हणून पश्चात्तापबुद्धी दिली आहे.

 पश्चात्तापाचा परिणाम
True-Repent खरा पश्चाताप

 १. स्वर्गात आनंद होतो.

लूक.१५:१० - पश्चात्ताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल देवाच्या दूतांसमोर आनंद होतो.

२. पापांची क्षमा मिळते.

प्रेषित. ३:१९ - यास्तव तुमची पापे पुसून टाकली जावी म्हणून पश्चात्ताप करा व मागे वळा.

आपले  तारण होते तेव्हाच पश्चात्ताप करावा असे नाही. दररोज झालेल्या पापाबद्दलही आपण पश्चात्ताप करून देवाजवळ कबुली द्यावी, तेव्हाच तो आपल्याला आपल्या पापांची क्षमा करतो.

पापांची क्षमा

 पापामूळे मनुष्य देवापासून वेगळा झाला ही कल्पना मानवांमध्ये सर्वत्र असते. पापांची क्षमा मिळविण्यासाठी मानवजात अनेक वेगवेगळे प्रयत्न करीत असते. परंतु पापांची क्षमा मिळवण्याचा एकच मार्ग आहे- ख्रिस्ताचा वधस्तंभावरील यज्ञ ! पापांची क्षमा हे देवाचे दान आहे. मनुष्याला हे दान ख्रिस्तावरील विश्वासाने मिळते.

मानवाने देवाच्या आज्ञा मोडल्या आहेत, तेव्हा क्षमा करण्याचा अधिकार केवळ देवाचाच आहे. ज्याच्याविरुद्ध पाप झाले आहे त्यालाच त्या पापाची क्षमा करता येते. सर्व पाप देवाविरुद्धच आहे. परंतु तो आम्हांला क्षमा करण्यास तयार आहे.

१ योहान.१:९ - जर आपण आपली पापे पदरी घेतली,तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील.

देवाने प्रभू येशू ख्रिस्ताला क्षमा करावयास नेमले. प्रेषित. ५:३१ - त्याने इस्राएलाला पश्चात्ताप व पापांची क्षमा ही देणगी देण्याकरिता देवाने त्याला आपल्या उजव्या हाताशी अधिपती व तारणारा असे उच्च पद दिले. केवळ ख्रिस्ताच्या द्वारे पापांची क्षमा होते.

प्रेषित.१३:३८ - ह्याच्याद्वारे (ख्रिस्ताद्वारे) तुम्हांला पापांच्या क्षमेची घोषणा करण्यात येत आहे.

क्षमेचा आधार

देव कनवाळू आहे म्हणून त्याने तारणाची योजना केली. एरवी पापांची क्षमा झाली नसती.

स्तोत्र.७८:३८ - पण तो कनवाळू असल्यामुळे त्यांच्या अपराधांची क्षमा करीत असतो. तो नाश करीत नाही.

जर पापांची क्षमा मिळविली नाही तर पुढे केवळ नाश ठेवलेला आहे.

देव न्यायी आहे म्हणून तो पापांची क्षमा करतो (१ योहान.१:९). पुन्हा पाहा, देव पवित्र असून क्षमा करतो. कारण पापाबद्दल प्रायश्चित्त झाले आहे व खंडणी भरली आहे. ख्रिस्ताच्या रक्ताने पापांची क्षमा होते.

क्षमेची पूर्णता

देवाने केलेली क्षमा पूर्ण असते. स्तोत्र.१०३:३ - तो तुझ्या सर्व दुष्कर्मांची क्षमा करतो.

यशया १:१८ - परमेश्वर म्हणतो, चला, या, आपण बुद्धिवाद करू. तुमची पातके लाखेसारखी लाल असली, तरी ती बर्फासारखी पांढरी होतील. ती किरमिजासारखी तांबडी असली तरी लोकरीसारखी निघतील.

एवढेच केवळ नव्हे, तर तो पूर्ण क्षमा करतो. तो पूर्वीची पापे विसरून जातो. त्यांची आठवण तो पुन्हा कधीच काढत नाही.

स्तोत्र. १०३:१२ - पश्चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे, तितके त्याने आमचे अपराध आमच्यापासून दूर केले आहेत. यशया ३८:१७ - तू माझी सर्व पापे आपल्या पाठीमागे टाकिली आहेत.

मनुष्याला स्वतःची किंवा इतरांची पापे विसरता आली नाहीत, तरी देव आपली पापे विसरतो.

  क्षमेच्या अटी

True-Repent खरा पश्चाताप
पश्चाताप

१. पश्चात्ताप : प्रेषित.५:३१ - आधी पश्चात्ताप मग क्षमा.
२. विश्वास : लूक.७:५० - तुझ्या विश्वासाने तुला तारले आहे.
३. पापांची कबुली : स्तोत्र.३२:५ - मी आपले पाप तुजजवळ कबूल केले, मी आपली अनीती लपवून ठेविली नाही; मी आपले अपराध परमेश्वराजवळ कबूल करीन, असे मी म्हणालो,तेव्हा तू मला माझ्या पापदोषाची क्षमा केली.
४. इतरांना क्षमा करणे : मत्तय.६:१५ - परंतु जर तुम्ही लोकांना क्षमा केली नाही, तर तुमचा पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही.

इफिस. ४:३२ - जशी देवाने ख्रिस्ताच्या ठायी तुम्हांला क्षमा केली आहे तशी तुम्हीही एकमेकांना क्षमा करा.

मत्तय.१८:२१-३५ कृतघ्न चाकराचा दृष्टांत वाचा.

देव आपल्याला क्षमा करायला सदैव तयार आहे. आपण दोन गोष्टी लक्षात ठेवाव्यात. पहिली देव क्षमा करतो म्हणून पाप करीत राहण्यास हरकत नाही. असे समज करून घेणे पूर्णपणे चूक आहे. असा विचार केल्याने आपण १) देवाचा अपमान करतो आणि त्याच्या दयेस मुकतो.

२) दुसरी देवाने आपल्याला क्षमा करावी अशी आपली इच्छा असेल, तर आपण क्षमेच्या अटी पूर्ण केल्या पाहिजेत.

तारणाच्या मार्गावरील पश्चात्ताप ही महत्वाची पायरी आहे. पश्चात्तापाशिवाय तारण अशक्य आहे.

 

जर आपण आशीर्वादित झाला असाल तर आपल्या प्रियजनास हे शिक्षण जरूर पाठवा.☺💓

 

Next Post Previous Post
1 Comments
  • Heart of Jesus Ministry
    Heart of Jesus Ministry २४ ऑगस्ट, २०२० रोजी ७:२५ PM

    खरोखर खूपच सुंदर व गरजेचा विषय आपण येथे मांडला आहे.👌👌

Add Comment
comment url