🙏 तुमची प्रार्थना विनंती येथे लिहा | Write Your Prayer Request Here

Christian Wedding ख्रिस्ती विवाह

ख्रिस्ती विवाह – बायबलनुसार विवाहाविषयी शिकवण

ख्रिस्ती विवाह – Christian Wedding

विवाहाची स्थापना परमेश्वर देवाने केली आहे

विवाह मानवी जीवनातील एक फार महत्त्वाची बाब आहे. या संदर्भात देवाची इच्छा व योजना काय आहे, हे प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने समजून घेतले पाहिजे. मानवी इतिहासातील पहिला विवाह एदेन बागेत झाला.

देवाने मानवाला उत्पन्न केले तेव्हा त्याने त्यांना नर व नारी उत्पन्न केले, असे पवित्र शास्त्र आपल्याला सांगते.

उत्पत्ती १:२७ – देवाने मानवाला आपल्या प्रतिरूपाचा उत्पन्न केले; नर व नारी अशी त्याने त्यांची उत्पत्ती केली.

देवाने आधी पुरुष उत्पन्न केला.

उत्पत्ती २:७

मनुष्य एकटा असावा हे बरे नाही, असे देवाने पाहिले. त्याला अनुरूप सहकारी होण्यासाठी देवाने स्त्री निर्माण केली.

उत्पत्ती २:१८

देवाने त्यांना आज्ञा केली, “फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा.”

उत्पत्ती १:२८

देवाने एकमेकांच्या मानवी गरजा व इच्छा ओळखून विवाह हा संबंध नेमून दिला. पुरुष व स्त्री यांना देवाने एकमेकांसाठी उत्पन्न केले. विवाहाने पुरुष व स्त्री एकरूप होतात.

मत्तय १९:५ – “आणि ती दोघे एकदेह होतील.”

ख्रिस्ती विवाह म्हणजे काय?

दोन ख्रिस्ती व्यक्ती लग्न करतात, तेव्हा त्या आयुष्यभर एकत्र राहण्याचा एकमेकांशी व देवाशी करार करतात.

१ करिंथ ७:३९ – नवरा जिवंत आहे तोपर्यंत बायको बांधलेली आहे.

विवाह आयुष्यभराचा प्रश्न आहे. म्हणून ख्रिस्ती व्यक्तीने विचारपूर्वक व प्रार्थनापूर्वक लग्न करावे. या संदर्भात देवाची इच्छा व योजना काय आहे, हे प्रत्येकाने समजून घ्यावे. आयुष्यातील प्रथम महत्त्वाची गोष्ट तारण आहे आणि त्यानंतर विवाह आहे.

ख्रिस्ती विवाह – Christian Wedding

विश्वासणाऱ्याने विश्वासणारीशीच लग्न करावे

विश्वासणाऱ्याने विश्वासणारीशीच लग्न करावे, अशी शिकवण जुन्या आणि नव्या करारात दिली आहे.

इस्राएली लोक कनान देशात स्थायिक झाले तेव्हा देवाने त्यांना या विषयाविषयी स्पष्ट सूचना दिल्या.

निर्गम ३४:१५-१६

त्याप्रमाणे नव्या करारातही अशी शिकवण दिली आहे.

२ करिंथ ६:१४-१६ – “तुम्ही विश्वास न ठेवणाऱ्यांबरोबर जडून विजोड होऊ नका...”

देवाने त्याच्या लोकांना स्पष्ट सूचना दिली आहे. अनेकांना या शिकवणीची माहिती नसते, काहीजण तिच्याकडे दुर्लक्ष करतात किंवा तिचे महत्त्व समजून घेत नाहीत. त्यामुळे विश्वासणारे आणि अविश्वासणारे यांच्यातील विवाहाविषयी मंडळीमध्ये योग्य बायबल शिक्षण देण्याची गरज आहे.

अविश्वासणाऱ्याचे आधीच लग्न झाले असेल आणि त्यानंतर पतीचे किंवा पत्नीचे तारण झाले, तर परिस्थिती निराळी आहे.

विवाहाचे उद्देश

१. साहचर्य

विवाहित स्त्री-पुरुषाने एकमेकांच्या गरजा जाणून एकत्र जीवन जगावे.

उपदेशक ४:९-१२ – एकट्यापेक्षा दोघे बरे; कारण त्यांच्या श्रमांचे त्यांना चांगले फळ प्राप्त होते. त्यांच्यातला एक पडला तर त्याचा सोबती त्याला हात देईल; पण जो एकटा असून पडतो त्याला हात देण्यास कोणी नसते. दोघे एकत्र निजले तर त्यांना ऊब येते; एकट्याला ऊब कशी येईल? जो एकटा असतो त्याच्यावर कोणी माणूस भारी झाला तर त्याचा प्रतिकार दोघांना करता येईल; तीनपदरी दोरी सहसा तुटत नाही.

स्त्रीशिवाय पुरुष अपूर्ण आहे आणि पुरुषाशिवाय स्त्री अपूर्ण आहे. त्यांना एकमेकांच्या सहकार्याची गरज आहे.

२. गृहाची स्थापना

संतती व गृहाची स्थापना हा विवाहाचा दुसरा उद्देश आहे.

३. लैंगिक शुद्धता व वैवाहिक सहजीवन

“फलद्रूप व्हा” ही आज्ञा देवाने आदाम व हव्वा यांना दिली.

विवाहातील लैंगिक संबंध पती-पत्नीच्या वैवाहिक जीवनाचा एक भाग आहे. देवाने विवाहाच्या चौकटीत स्त्री-पुरुषासाठी हा संबंध दिला आहे. त्यामुळे पती-पत्नीने आपल्या वैवाहिक जीवनात शुद्धता, प्रेम, विश्वास आणि परस्पर सन्मान राखावा.

विवाह ही पवित्र अवस्था आहे

देवाने मनुष्याच्या सुखासाठी विवाह आयोजित केला. पती-पत्नीने एकदेह होऊन आयुष्यभर एकत्र राहावे आणि एकमेकांच्या गरजा समजून एकमेकांना साहाय्य करावे.

एकत्र राहण्यात त्यांना सुख मिळावे म्हणून देवाने विवाहित स्थिती आशीर्वादित केली. वैवाहिक सुख आपोआप प्राप्त होत नाही. प्रत्येक पती-पत्नीला प्रेमात, विश्वासात व देवाच्या आशीर्वादात राहण्याचा प्रयत्न करावा लागतो.

या बाबतीत साहाय्य लागत असेल, तर त्यांनी मंडळीचे पाळक किंवा प्रौढ ख्रिस्ती व्यक्तीकडून मार्गदर्शन प्राप्त करून घ्यावे.

घटस्फोटाविषयी पवित्र शास्त्राचे शिक्षण

घटस्फोट देणे ही देवाची मूळ इच्छा व योजना नाही, असे पवित्र शास्त्रातील शिकवणीत स्पष्ट होते.

मलाखी २:१६ – परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, “मला सूटपत्राचा तिटकारा आहे...”

प्रत्येक जोडप्याने एकमेकांना क्षमा करून देवाचे साहाय्य घेऊन एकत्र राहण्याचा प्रयत्न करावा. पाहिजे असल्यास मंडळीचे पाळक किंवा वडीललोक यांच्याकडून मार्गदर्शन मागावे. कोणतीही समस्या देवाच्या शक्तीपलीकडची नाही.

विवाहाने पती-पत्नी एकदेह होतात. यामुळे ते पुढे दोन नव्हेत, तर एकदेह आहेत. यास्तव देवाने जे जोडले ते मनुष्याने तोडू नये, असे प्रभू येशू ख्रिस्ताने सोडचिठ्ठीविषयी उत्तर देताना सांगितले.

मत्तय १९:६

मनुष्याचा अशक्तपणा व अंतःकरणाचा कठोरपणा यामुळे देवाची मूळ योजना सिद्धीस नेता येत नाही, हे देवाला माहीत होते. म्हणून मोशेच्या काळात त्याने सोडचिठ्ठीविषयी मोशेला आज्ञा केली.

सोडचिठ्ठी ही देवाची मूळ इच्छा किंवा योजना नव्हती, हे प्रभू येशू ख्रिस्ताने स्पष्ट सांगितले.

मत्तय १९:७-८ – “ते त्याला म्हणाले, ‘सूटपत्र देऊन तिला टाकावे’ अशी आज्ञा मोशेने का दिली? तो त्यांस म्हणाला, तुमच्या अंतःकरणाच्या कठोरपणामुळे मोशेने तुम्हांस आपल्या बायका टाकू दिल्या; तरी सुरुवातीपासून असे नव्हते.”

घटस्फोट देणे हा नियम नाही तर अपवाद आहे

ख्रिस्ती विवाह आणि घटस्फोट – Christian Divorce

घटस्फोटाविषयी बायबलमध्ये गंभीर शिकवण दिली आहे. प्रभू येशूने विवाहाच्या पवित्रतेवर भर दिला.

मत्तय १९:९ – “मी तुम्हांस सांगतो की, जो कोणी आपल्या बायकोला जारकर्माच्या कारणाशिवाय टाकून दुसरी करतो तो व्यभिचार करतो आणि जो कोणी अशा टाकलेल्या स्त्रीबरोबर लग्न करतो तोही व्यभिचार करतो.”

या विषयाकडे पवित्र शास्त्राच्या शिकवणीच्या प्रकाशात गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. पती-पत्नीमध्ये समस्या निर्माण झाल्यास त्यांनी देवाचे साहाय्य घेऊन, एकमेकांशी क्षमा, प्रेम व विश्वासाने वागण्याचा प्रयत्न करावा आणि आवश्यक असल्यास मंडळीतील जबाबदार सेवकांकडून मार्गदर्शन घ्यावे.

विवाह देवाच्या दृष्टीने पवित्र व उदात्त संस्था आहे.

समलिंगी विवाहाविषयी बायबलची शिकवण

या लेखातील बायबलच्या शिकवणीनुसार विवाहाची देवाने केलेली योजना पुरुष आणि स्त्री यांच्या वैवाहिक संबंधावर आधारित आहे.

लेवीय २०:१३ – “कोणा पुरुषाने स्त्रीगमनाप्रमाणे पुरुषगमन केले तर ते त्या दोघांचे अमंगळ कृत्य होय...”

रोम १:२६-२७ – “ह्या कारणांमुळे देवाने त्यांना दुर्वासनांच्या स्वाधीन केले; त्यांच्यातल्या स्त्रियांनी शरीराचा नैसर्गिक उपभोग सोडून विपरीत आचरण केले. तसेच पुरुषांनीही स्त्रियांचा नैसर्गिक उपभोग सोडून परस्परे कामसंतप्त होऊन पुरुषांनी पुरुषांबरोबर अनुचित कर्म केले...”

बायबलनुसार योग्य जोडीदार कसा निवडावा?

विवाह हा आयुष्यभराचा महत्त्वाचा निर्णय असल्यामुळे जोडीदार निवडताना देवाची इच्छा, बायबलची शिकवण, विश्वास, चारित्र्य आणि प्रार्थना यांना महत्त्व देणे आवश्यक आहे.

👇 हा संबंधित लेखही वाचा:

बायबलनुसार योग्य जोडीदार कसा निवडावा

ख्रिस्ती विवाहातील हळद समारंभ व इतर पारंपरिक रूढींबद्दल बायबल काय सांगते, हे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.


कृपया हा लेख इतरांसोबत शेअर करा आणि त्यांच्यासाठी आशीर्वाद ठरा.

Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url
Follow My WhatsApp Channel