बायबलनुसार पत्नीच्या जबाबदाऱ्या : ख्रिस्ती पत्नी कशी असावी? christian wife bible responsibilities

बायबलनुसार पत्नीच्या जबाबदाऱ्या : ख्रिस्ती पत्नी कशी असावी?


christian-wife-bible-responsibilities

 प्रस्तावना

विवाह ही देवाने स्थापन केलेली पवित्र व्यवस्था आहे. देवाने स्त्री आणि पुरुष या दोघांनाही आपल्या प्रतिरूपात निर्माण केले (उत्पत्ति १:२७). त्यामुळे पत्नीचे स्थान कमी किंवा दुय्यम नाही. बायबलनुसार विवाह हे प्रेम, विश्वास, परस्पर आदर आणि देवाच्या इच्छेनुसार जगण्याचे नाते आहे.

भारतीय समाजातील पत्नीविषयी पारंपरिक विचार

भारतातील काही पारंपरिक आणि पितृसत्ताक विचारसरणींमध्ये पत्नीकडे समान जीवनसाथी म्हणून न पाहता, मुख्यतः घर आणि कुटुंब सांभाळणारी व्यक्ती म्हणून पाहिले जाते. स्वयंपाक, घरकाम, मुलांचे संगोपन आणि सासरच्या मंडळींची सेवा यांसारख्या जबाबदाऱ्या तिच्याच असाव्यात, असे गृहीत धरले जाते. चूल आणि मूल” हेच तिचे प्रमुख कर्तव्य मानले जाते. ती नोकरी करत असली तरी घरकामाची संपूर्ण जबाबदारी तिचीच असावी, असाही आग्रह काही ठिकाणी केला जातो.

पत्नीने पतीचे आणि सासरच्या मंडळींचे म्हणणे ऐकावे, स्वतःच्या इच्छा व मतांपेक्षा कुटुंबाला प्राधान्य द्यावे, मतभेद सहन करून संसार टिकवावा आणि त्यांच्या कोणत्याही निर्णयांना विरोध करू नये, अशा अपेक्षाही काही ठिकाणी केल्या जातात.

त्यामुळे तिच्या स्वातंत्र्याला, निर्णयक्षमतेला आणि समान हक्कांना दुय्यम स्थान मिळते. जे देवाच्या व्यवस्थेनुसार नाही.

बायबलनुसार पत्नीचे स्थान

परंतु बायबलनुसार पत्नीला दुय्यम स्थान नसून ती समान मूल्य असलेली जीवनसाथी आहे. ती देवाच्या सृष्टीच्या व्यवस्थेत सहभागी, पतीला सहाय्य करणारी, पतीसाठी गौरव ठरणारी आणि आपल्या सुज्ञपणाने घर उभारणारी स्त्री आहे.

पती-पत्नीचे नाते प्रेम, परस्पर आदर आणि एकमेकांच्या मतांचा आदर यावर आधारित असावे.

बायबलनुसार पत्नीच्या मुख्य जबाबदाऱ्या

1. पत्नी ही देवाच्या सृष्टीवर अधिकार करण्यामध्ये पतीची सहकारी आहे

उत्पत्ति 1:27-28; 2:18, 20

पवित्र शास्त्र सांगते की, देवाने मनुष्याला आपल्या प्रतिरूपात निर्माण केले. त्याने पुरुष आणि स्त्री दोघांनाही आपल्या प्रतिरूपात निर्माण केले आणि दोघांनाही पृथ्वीवर फलद्रूप होण्याची, पृथ्वी भरून टाकण्याची आणि सृष्टीवर अधिकार करण्याची जबाबदारी दिली.

यावरून एक महत्त्वाचे सत्य स्पष्ट होते: देवाने पृथ्वीवरील जबाबदारी केवळ पुरुषाला दिली नाही, तर स्त्री आणि पुरुष दोघांनाही दिली आहे. त्यामुळे पत्नी ही पतीपेक्षा कमी मूल्याची किंवा कनिष्ठ व्यक्ती नाही. देवाच्या दृष्टीने स्त्री आणि पुरुष दोघेही मूल्यवान आहेत.

2. पत्नी ही पतीची अनुरूप सहकारी अनुरूप साहाय्यक

उत्पत्ति 2:18 मध्ये देव म्हणतो:

मनुष्य एकटा असावा हे बरे नाही; तर त्याच्यासाठी अनुरूप साहाय्यक मी करीन.”

देवाने पाहिले की आदाम एकटा असणे योग्य नाही. म्हणून त्याने स्त्रीला त्याच्यासाठी अनुरूप साहाय्यक” म्हणून निर्माण केले.

येथे “साहाय्यक” या शब्दाचा अर्थ गुलाम, सेविका किंवा कनिष्ठ व्यक्ती असा नाही. पत्नी ही पतीची जीवनसाथी आणि सहकारी आहे. ती पतीच्या जीवनात साथ देणारी, त्याला प्रोत्साहन देणारी आणि देवाने दिलेल्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी सहकार्य करणारी व्यक्ती आहे.

साहाय्यक” या शब्दामुळे कनिष्ठत्व सिद्ध होत नाही. उदाहरणार्थ, पवित्र आत्म्यालाही “साहाय्यक” असे संबोधले आहे (योहान 14:16). याचा अर्थ पवित्र आत्मा कनिष्ठ आहे असा होत नाही. उलट, तो त्रिएक देवत्वातील व्यक्ती आहे. त्यामुळे साहाय्यक” म्हणजे कनिष्ठ व्यक्ती असा अर्थ काढणे योग्य नाही.

पत्नी ही पतीची:

  • सहकारी
  • सल्लागार
  • प्रोत्साहन देणारी
  • दुःखात साथ देणारी
  • देवाच्या इच्छेत पुढे जाण्यास मदत करणारी

अशी असू शकते.

पतीला मदत करणे म्हणजे काय?

पती अडचणीत असताना त्याला धीर देणे, योग्य निर्णयासाठी प्रोत्साहन देणे, कुटुंबाच्या जबाबदाऱ्या एकत्र सांभाळणे आणि आध्यात्मिक जीवनात त्याला साथ देणे हे पत्नीचे महत्त्वपूर्ण कार्य आहे.

तिने पतीच्या प्रत्येक चुकीच्या गोष्टीला समर्थन देणे आवश्यक नाही. योग्य वेळी प्रेमाने आणि नम्रतेने सत्य सांगणे हे देखील एका चांगल्या सहकाऱ्याचे कार्य आहे.

एक सुज्ञ पत्नी पतीच्या जीवनात मोठा आशीर्वाद ठरते.

3. पत्नी ही पतीचा मुकुट आहे

सद्‍गुणी स्त्री आपल्या पतीला मुकुट आहे, पण लाज आणणारी स्त्री त्याची हाडे सडवणारी आहे. — नीतिसूत्रे १२:४

बायबल पत्नीला पतीचा मुकुट” म्हणते. मुकुट हा सन्मान, प्रतिष्ठा आणि गौरवाचे प्रतीक आहे. यावरून सद्गुणी पत्नी आपल्या पतीच्या जीवनात किती महत्त्वाची आहे हे दिसून येते.

पत्नी पतीचा मुकुट कशी बनू शकते?

1. आपल्या चारित्र्याने

पत्नीचे खरे सौंदर्य केवळ बाह्य रूपात नसते. पवित्र आणि सद्गुणी जीवन हे तिचे खरे सौंदर्य आहे.

2. आपल्या शब्दांनी

पत्नीचे शब्द पतीला प्रोत्साहन देऊ शकतात किंवा दुःखी करू शकतात. प्रेमाचे आणि सुज्ञतेचे शब्द घरामध्ये शांती निर्माण करतात.

3. आपल्या निष्ठेने

पती-पत्नीच्या नात्यात विश्वास आणि निष्ठा अत्यंत महत्त्वाची आहे. एक विश्वासू पत्नी पतीच्या जीवनात सुरक्षितता आणि आनंद निर्माण करते.

4. आपल्या साक्षीने

पत्नीचे वर्तन आणि देवभय केवळ पतीसाठीच नव्हे, तर संपूर्ण कुटुंबासाठी चांगले उदाहरण ठरते.

नीतिसूत्रे ३१:१० मध्ये सद्गुणी स्त्रीचे मूल्य मौल्यवान असल्याचे सांगितले आहे. म्हणून पत्नीचे चारित्र्य, शहाणपण, प्रेम आणि चांगले वर्तन पतीच्या जीवनाला सन्मान मिळवून देतात. ती कुटुंबात शांती, विश्वास आणि चांगले वातावरण निर्माण करण्यास हातभार लावते.

याउलट, चुकीचे वर्तन करणारी पत्नी पतीच्या जीवनात दुःख आणि लज्जा आणू शकते. म्हणून पत्नीने आपल्या जीवनातून देवभक्ती, सद्गुण आणि चांगले चारित्र्य प्रकट करावे.

4. पत्नीने आपल्या पतीच्या अधीन राहावे

बायबल संदर्भ: 1 पेत्र 3:1 आणि इफिस 5:22-24

बायबल पत्नीला आपल्या पतीच्या अधीन राहण्याची शिकवण देते. “जशा प्रभूच्या तसे स्वतःच्या पतीच्या अधीन असा” हा विषय अनेकदा गैरसमजाने पाहिला जातो. म्हणून या वचनांचा योग्य संदर्भ समजून घेणे आवश्यक आहे.

अधीन राहणे म्हणजे गुलामगिरी किंवा स्वतःचे मत, अधिकार आणि व्यक्तिमत्त्व गमावणे नव्हे. देवाने दिलेल्या वैवाहिक व्यवस्थेचा आदर करून एकमेकांना सहकार्य करणे होय.

अधीनत्व म्हणजे देवाने वैवाहिक जीवनासाठी दिलेल्या व्यवस्थेचा आदर करून पतीच्या योग्य नेतृत्वाला सहकार्य करणे. पत्नीने पतीचा आदर करावा, त्याच्या निर्णयांमध्ये योग्य सल्ला द्यावा आणि कुटुंबाच्या हितासाठी त्याच्यासोबत एकमताने चालण्याचा प्रयत्न करावा.

त्याच वेळी, पतीला पत्नीवर मनमानी करण्याचा अधिकार नाही.

इफिस 5:25—  ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती करून स्वतःला तिच्यासाठी दिले तसे तुम्हीही आपल्या पत्नींवर प्रीती करा.”

म्हणून ख्रिस्ती अधीनता भीतीवर नव्हे, तर प्रेम, आदर, विश्वास आणि देवाच्या वचनावर आधारित आहे.

परंतु देवाची आज्ञा मनुष्याच्या आज्ञेपेक्षा श्रेष्ठ आहे. पतीने पाप करण्यास किंवा देवाच्या इच्छेविरुद्ध जाण्यास सांगितले तर पत्नीने देवाशी विश्वासू राहिले पाहिजे.

म्हणून ख्रिस्ती वैवाहिक जीवन एकतर्फी अधिकारावर नव्हे, तर प्रेम, आदर आणि परस्पर अधीनतेवर आधारित असावे.

5. सुज्ञ पत्नी ही घर बांधते.

नीतिसूत्रे 14:1 आणि तीत 2:4-5

नीतिसूत्रे 14:1 म्हणते:  - प्रत्येक सुज्ञ स्त्री आपले घर बांधते; पण मूर्ख स्त्री आपल्या हातांनी ते पाडून टाकते.”

घर केवळ भिंतींनी बनत नाही. घरातील वातावरण प्रेम, विश्वास, क्षमा आणि शहाणपणाने तयार होते.

पत्नी आपल्या वर्तनाने घर उभारूही शकते आणि चुकीच्या वागण्याने ते मोडूही शकते.

पत्नी घर कशाने बांधते?

1. प्रेमाने - प्रेम हे घराला जोडून ठेवते. पत्नीने पती आणि मुलांशी प्रेमाने वागावे.

2. शहाणपणाने - प्रत्येक निर्णय रागात किंवा भावनेच्या भरात घेणे योग्य नाही. सुज्ञ पत्नी विचारपूर्वक बोलते आणि वागते.

3. योग्य शब्दांनी - कठोर आणि अपमानजनक शब्द नातेसंबंध तोडू शकतात. प्रेमळ शब्द घरातील वातावरण बदलू शकतात.

4. मुलांच्या संगोपनाद्वारे - तीत 2:4-5 मध्ये कुटुंबाविषयी प्रेम आणि घराच्या जबाबदारीची शिकवण दिली आहे.

पत्नीने मुलांना देवाचे वचन, प्रेम, प्रामाणिकपणा आणि योग्य जीवन जगण्याचे शिक्षण द्यावे.

5. प्रार्थनेद्वारे -प्रार्थना करणारी पत्नी आपल्या कुटुंबासाठी आध्यात्मिक आधार बनते. ती पतीसाठी, मुलांसाठी आणि संपूर्ण घरासाठी प्रार्थना करते. देवाच्या मदतीवर अवलंबून राहते.

पत्नीप्रमाणेच पतीलाही बायबल मोठी जबाबदारी देते. “पतीचे कर्तव्य” हा लेख नक्की वाचा. 

बायबलमधील आदर्श स्त्रियांची उदाहरणे

रुथ – निष्ठेचे उदाहरण

रुथने कठीण परिस्थितीत निष्ठा दाखवली. तिच्या जीवनातून विश्वास, निष्ठा आणि देवावर अवलंबून राहण्याचे उदाहरण मिळते.

अबीगईल – सुज्ञतेचे उदाहरण

अबीगईलने योग्य वेळी सुज्ञपणे वागून मोठा अनर्थ टाळला (1 शमुवेल 25).

हन्ना – प्रार्थनेचे उदाहरण

हन्नाने आपल्या दुःखामध्ये देवाकडे प्रार्थना केली. तिचे जीवन आपल्याला देवावर विश्वास ठेवण्याची प्रेरणा देते (1 शमुवेल 1).

नीतिसूत्रे 31 मधील स्त्री – सद्गुणी स्त्रीचे उदाहरण

ती मेहनती, सुज्ञ, विश्वासू आणि देवाचे भय बाळगणारी होती.

 👉 “आपले कुटुंब देवाच्या इच्छेनुसार प्रेम, शांती आणि विश्वासाने घडवायचे आहे? मग ‘ख्रिस्ती परिवार’ हा लेख नक्की वाचा.”

निष्कर्ष

बायबलनुसार पत्नीचे सर्वांत मोठे कर्तव्य म्हणजे देवाचे भय बाळगून प्रेम, शहाणपण आणि विश्वासाने आपले वैवाहिक आणि कौटुंबिक जीवन जगणे.

आदर्श पत्नी परिपूर्ण नसते, परंतु ती देवाच्या वचनानुसार वाढण्याचा प्रयत्न करते. ती पतीचा आदर करते, त्याच्यावर प्रेम करते, त्याची सहकारी बनते आणि आपल्या घराला प्रेम, प्रार्थना व देवाच्या वचनावर उभे ठेवते.

नीतिसूत्रे 31:30  “परमेश्वराचे भय बाळगणार्‍या स्त्रीची प्रशंसा होते.”
Previous Post
No Comment
Add Comment
comment url
Follow My WhatsApp Channel